किडनी हा शरीरातल्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. किडनी शरीरातले अनावश्यक घटक बाहेर टाकण्याचं आणि रक्त शुद्ध करण्याचं काम करते. बदलती जीवनशैली, दिवसभरात पुरेसं पाणी न पिणं, योग्य आहार न घेणं आदी कारणांमुळे किडनीशी संबंधित विकार होतात. डायबेटीस, हृदयविकारामुळेदेखील किडनीच्या कार्यावर परिणाम होतो. किडनी स्टोन अर्थात मूतखडा हा आजार अनेकांना होतो. अलीकडच्या काळात ही समस्या असलेल्यांची संख्या वेगानं वाढत आहे. किडनी स्टोनच्या वेदना असह्य असतात. स्टोनमुळे युरिन अडून राहिल्याने समस्यांमध्ये भर पडते. किडनी स्टोनचा त्रास कमी व्हावा, यासाठी वैद्यकीय उपचारांसोबत अनेक उपाय केले जातात. बीअर प्यायल्याने किडनी स्टोन निघून जाण्यास मदत होते, असं काही जण म्हणतात; पण मुळातच मद्यपानाचे अनेक दुष्परिणाम आहेत. किडनी स्टोनचा त्रास असलेल्या व्यक्तींना बीअर प्यायल्याने काही प्रमाणात फायदा होत असला तरी नुकसान होण्याचादेखील धोका असतो. त्याविषयी जाणून घेऊ या.
बीअर डाययुरेटिक स्वरूपात काम करते. यामुळे युरिनचं प्रमाण वाढतं. जास्त प्रमाणात बीअर प्यायल्याने युरिनला वारंवार जावं लागतं. त्यामुळे किडनी स्टोनचे बारीक तुकडे युरिनवाटे निघून जातात, असं बोललं जातं; पण अति प्रमाणात बीअर पिणं शरीरासाठी नुकसानदायी ठरू शकतं.
ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे, त्यांना बऱ्याचदा बीअर प्यायल्याने त्रास होऊ शकतो. बीअर प्यायल्याने वेदना आणखी वाढू शकतात. अनेकदा मूत्रमार्गात एखादा खडा अडकून बसतो. त्यामुळे युरिन पास करणं अवघड जातं. अशा स्थितीत वेदना वाढून आणखी त्रास होऊ शकतो.
दीर्घकाळ मद्यपान केल्यास किंवा बीअर प्यायल्यास स्टोनचा आकार वाढू शकतो. बीअरमुळे शरीरात हाय ऑक्सेलेटची पातळी वाढते. यामुळे नव्याने स्टोनची निर्मिती होऊ शकते किंवा स्टोनचा आकार वाढू शकतो. जे जास्त प्रमाणात बीअर पितात, त्यांना किडनी विकार होण्याचा धोका असतो. बीअरमुळे क्रोनिक किडनी डिसीज होऊ शकतात.
शरीरातल्या स्टोनचा आकार मोठा असेल तर त्रास जास्त होऊ शकतो. स्टोनचा आकार 5mm पेक्षा कमी असेल तर तो युरिनच्या माध्यमातून बाहेर पडू शकतो. परंतु, स्टोनचा आकार जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला आणि योग्य उपचार घेणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणात बीअर प्यायल्याने शरीरातलं रक्त शुद्ध करण्यासाठी किडनीवर ताण येतो. यामुळे किडनी वरचा ताण वाढतो. बीअर प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ लागतं. यामुळे पेशी आणि एकूणच शरीराच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे किडनी स्टोनचा त्रास कमी होईल या उद्देशानं जास्त प्रमाणात बीअर पिणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.