आज दि.२६ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

काँग्रेस आंदोलनात राहुल गांधींची ‘आजी’ स्टाईल, पोलिसांनी घेतलं ताब्यात

नॅशनल हेराल्ड केसमध्ये आज पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची चौकशी केली जात आहे. याविरोधात धरणं आंदोलन करणारे काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस खासदारांना पोलिसांनी विजय चौकातून ताब्यात घेतलं आहे. या आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्यासारखंच रस्त्यावर बसून आंदोलन केलं.

वरातीत DJ ऐकताच चवताळला घोडा, वऱ्हाड्यांना पायाखाली तुडवलं

लग्न म्हटलं की घोडा आला. घोड्यावर बसवून नवरदेवाची वरात काढली जाते. अशाच एका लग्नाच्या वरातील घोड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वरातीत डीजेचा आवाज ऐकताच हा घोडा चवताळला. त्याने वऱ्हाड्यांना आपल्या पायाखाली तुडवलं आहे. ही धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे.नवरदेवाची वरात निघण्याच्या तयारीत होती. घोडाही वरातीसाठी सजला होता. वऱ्हाड्यांनी डीजेवर ताल धरला. डीजेचा आवाज वाढत गेला आणि जसा हा आवाज घोड्याच्या कानात घुसला तसा तो बेभान झाला. त्याने आपले पुढचे दोन्ही पाय वर केले आणि मागच्या दोन पायांवर उड्या मारू लागला. त्याने आपल्यासमोर येणाऱ्या प्रत्येकाला पायाखाली चिरडलं.

MBA करू इच्छिणाऱ्यांसाठी मोठी बातमी! CAT Exam 2022 ची तारीख जाहीर

‘CAT  Exam 2022’ 27 नोव्हेंबरला होणार आहे, यासंबंधीची जाहिरात 31 जुलैला जारी केली जाईल. अधिकृत वेबसाइट 1 ऑगस्ट रोजी लाइव्ह असेल, वेबसाइटवर अर्ज प्रक्रिया, परीक्षेची तारीख, प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख यांचा तपशील असेल. कॅटच्या निमंत्रकांच्या म्हणण्यानुसार अर्जाची प्रक्रिया 03 ऑगस्टपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

देशभरातील काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाला नागपूरमध्ये गालबोट!

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीने मंगळवारी चौकशी केली. ही चौकशी सुमारे 3 तास चालली. लंच ब्रेकनंतर त्यांची पुन्हा ईडी चौकशी करणार आहे. दुसरीकडे, ईडीच्या या कारवाईविरोधात काँग्रेसने रस्त्यावरून संसदेपर्यंत घेराव घातला. या मुद्द्यावरून काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात सरकारला घेरले, तर काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी या कारवाईचा निषेध केला. अशाच प्रकारचे आंदोनल महाराष्ट्रातही सुरू आहे. दरम्यान, राज्यभर काँग्रेसचे आंदोलन सुरू असताना नागपूरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनाला गालबोट लावले आहे.नागपूरमध्ये आंदोलनादरम्यान एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात हे आंदोलन नागपूरच्या जीपीओ चौकात सुरू होते त्यावेळी ही घटना घडली. महत्त्वाचं म्हणजे आंदोलनाची चर्चा घडवून आणण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भंगार मधून ती कार उचलून आणली व आंदोलन स्थळी पेटवून दिली. 

गणेशोत्सवाला महागाईची झळ; मूर्तींच्या किंमतीत 15 ते 20 टक्के वाढ

दोन वर्षांपूर्वी जगभरामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने शिरकाव  केला. यातून सर्वांचे जनजीवन ठप्प झालं. भारतात देखील निर्बंध लावण्यात आले. यामुळे सर्व सण उत्सव नियमांचे पालन करून साजरे करावे लागले. पण यंदा निर्बंध मुक्त झाल्याने सर्वच धर्मीय सण उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे होत आहेत. पुढच्या महिन्यात सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जाणार आहे.मात्र, वाढत्या महागाई मध्ये रंग, माती आणि कारागिरांचा खर्च वाढल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गणेश मूर्तींच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी महागलेल्या असतील,असे मूर्तिकार सांगतात.

‘भाईं’चं स्थान धोक्यात, मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष बदलणार! हे नाव आघाडीवर

विधान परिषद निवडणुकीमध्ये एका उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर आता काँग्रेस ऍक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. चंद्रकांत हांडोरे यांच्या गळ्यात मुंबई अध्यक्षपदाची माळ पडू शकते. भाई जगताप हे सध्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. मुख्य म्हणजे विधान परिषद निवडणुकीमध्ये भाई जगताप आणि चंद्रकांत हांडोरे यांच्यातच शेवटच्या फेरीचा सामना रंगला, या सामन्यात चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला.

शिवसेनेच्या धनुष्याची लढाई, निवडणूक आयोगाच्या ‘ऍक्शन’विरुद्ध ठाकरे सुप्रीम कोर्टात, 1 ऑगस्टला सुनावणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेना गटाच्या याचिकेवर निवडणूक आयोगाच्या कारवाईविरुद्ध उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 1 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. शिंदे गटाने आपल्यालाच असली शिवसेना म्हणून मान्यता मिळावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. मंगळवारी उद्धव ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या पीठाकडे निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीमुळे या प्रकरणाची सुनावणी प्रभावित होईल, असा दावा सिब्बल यांनी केला आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आता भाजपचा नेता; शरद पवारांच्या जागी या खासदाराची वर्णी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद संचालक मंडळ काही दिवसांपूर्वी बरखास्त करण्यात आलं होतं.. भारतीय कुस्तीगीर संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला होती. महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष शरद पवार होते. यानंतर आता याजागी कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. याजागी आता भाजपच्या रामदास तडस यांची वर्णी लागणार आहे.अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी धवलसिंह मोहिते पाटील आणि काका पवार यांनी अध्यक्ष पदाचासाठीचा अर्ज घेतला मागे आहे. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला रामदास तडस यांच्या रूपाने नवा अध्यक्ष मिळणार आहे.

पारंपारिक शेतीला फाटा देत ‘हे’ गाव करतय लाखोंची कमाई

उस्मानाबाद जिल्ह्यातील खामकरवाडी गावातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीचे पर्याय स्वीकारले आहेत. पारंपारिक शेती करत असताना खूप कष्ट करावे लागते आणि हवा तसा मोबदला देखील मिळत नसल्याने शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होत नाही. ही बाब ओळखून येथील शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करीत शेतात तुतीची लागवड केली आहे. शेती करत असताना एखाद्या जोड व्यवसायाची साथ नक्की असावी. आज शेती व्यतिरिक्त पशुसंवर्धन, कुकुट पालन, शेळीपालन असे जोडधंदे घेतले जातात. नवीन युगाचे नवीन व्यवसाय म्हणजेच रेशीम शेती. हा व्यवसाय अगदी कमी खर्चात करता येतो. आज रेशीम शेतीमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात व कमीत कमी वेळेत सर्वात जास्त उत्पन्न घेता येते.

एकाच वेळी जन्मलेल्या पाचही बाळांचा मृत्यू; लग्नाच्या 7 वर्षांनंतर आई बनूनही रिकामीच राहिली कुस

आई होणं हा आनंदाचा क्षण असतो. पण काही महिलांना काही कारणामुळे हे सुख लवकर लाभत नाही. मूल होण्यासाठी त्या किती तरी प्रयत्न करतात, कित्येक वर्षे वाट पाहतात. काही वेळा चमत्कार होतो. जिथं अनेक वर्षे एक मूल होत नाही, तिथं एक नव्हे तर जुळी, तिळी मुलंही जन्माला येतात. असंच सुख राजस्थानमधील एका महिलेच्या पदरात पडलं. लग्नाच्या 7 वर्षांनंतर ती पहिल्यांदाच आई झाली. तिने एक-दोन नव्हे तर तब्बल 5 मुलांना एकाच वेळी जन्म दिला. पण तरी तिची कुस शेवटी रिकामीच राहिली. 7 वर्षांनी झालेल्या पाचपैकी एकही मूल जिवंत राहिलं नाही. करौलीच्या मासलपूरमधील पिपरानी गावातील रेशमा. लग्नाला सात वर्षे झाले तरी तिला मूल होत नव्हतं. अखेर 7 वर्षांनी तिने गूड न्यूज दिली. ती प्रेग्नंट राहिली. सोमवारी (25 जून) करौलीतील एका खासगी रुग्णालयात तिची डिलीव्हरी झाली. प्रसूतीच्या कालावधीआधीच तिची प्रसूती झाली.  तिने एकाच वेळी तब्बल पाच मुलांना जन्म दिला. यात दोन मुलं आणि तीन मुली होत्या. रेशमाच्या कुटुंबात आनंदीआनंद होता. पण त्यांचा आनंद काही तासच राहिला.

पुढील तीन दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

गेल्या आठवड्यात मराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. नाशिक आणि पालघर जिल्ह्यात कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर मुंबईसह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मात्र गेल्या तीन-चार दिवसांत पावसानं उसंत घेतली आहे. यानंतर आता हवामान विभागाकडून राज्यात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागानं आज पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या १८ जिल्ह्यांना पिवळा इशारा (येलो अलर्ट) जारी केला आहे. येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबतचं ट्वीट केलं आहे.

मास्टरकार्ड घेणार पेटीएमची जागा! बीसीसीआयने केला शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मास्टरकार्डसोबत शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार केला आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून भारतीय संघाचा शीर्षक प्रायोजक पेटीएमऐवजी मास्टरकार्ड असेल. विशेष म्हणजे, पेटीएमने स्वत: आपले सर्व अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंती बीसीसीआय केली होती होती. पेटीएमची ही विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे.

२०१९ मध्ये, बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी पेटीएमचे शीर्षक प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढवले होते. त्यासाठी पेटीएमला २०१९ ते २०१३ या काळासाठी ३२६.८० कोटी रुपये बीसीसीआयला देणे होते. २०१९ पासून प्रत्येक सामन्यासाठी पेटीएम ३.८० कोटी रुपये खर्च करत होते. मात्र, आर्थिक अचडणीपोटी पेटीएमने शीर्षक प्रायोजकत्व सोडण्याचा निर्णय घेतला. यासोबतच आपले अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंतीही बीसीसीआयकडे केली होती.

नीरज चोप्रा दुखापतीमुळे आगामी स्पर्धेतून बाहेर

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला दुखापत झाल्याने तो आगामी स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

जागतिक अजिंक्य स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.