धावपटू उत्तेजक चाचणीत दोषी ; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला आणखी एक धक्का

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला अवघे दोन दिवस शिल्लक असताना भारताला पुन्हा धक्का बसला असून महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले संघातील एक धावपटू उत्तेजक द्रव्य चाचणीत दोषी आढळली आहे. मात्र, दोषी आढळलेल्या खेळाडूचे नाव स्पष्ट झालेले नाही.

‘‘राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या रिले संघातील धावपटू उत्तेजक चाचणी दोषी आढळली असून तिने स्पर्धेतून माघार घेतली आहे,’’ अशी सूत्रांनी माहिती दिली. या खेळाडूने स्पर्धेतून माघार घेतल्याने केवळ चार धावपटूंसह भारताचा ४ बाय १०० मीटर रिले संघ बर्मिगहॅमसाठी रवाना झाला. या संघातील कोणात्याही धावपटूला दुखापत झाल्यास अन्य धावण्याच्या स्पर्धेतील खेळाडूला तिची जागा घेता येईल. मात्र, याचा फटका संघाच्या कामगिरीला बसू शकतो.

भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने सुरुवातीला द्युती चंद, हिमा दास, स्रबनी नंदा, एनएस सिमी, सेकर धनलक्ष्मी आणि एमव्ही जिल्ना या धावपटूंचा ३७ सदस्यीय भारतीय अ‍ॅथलेटिक्स चमूमध्ये समावेश केला होता. परंतु, या स्पर्धेसाठी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला ३६ खेळाडूंचीच परवानगी मिळाल्याने जिल्नाला संघातून वगळण्यात आले. मात्र, नंतर धनलक्ष्मी उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे तिच्या जागी पुन्हा जिल्नाला संघात स्थान मिळाले.

धावपटू सेकर धनलक्ष्मी आणि तिहेरी उडीपटू ऐश्वर्या बाबू या यापूर्वी उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्या होत्या. यात आता आणखी एका धावपटूचा समावेश झाल्याने भारताची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.