वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या गेल्या १८-२० वर्षांच्या इतिहासात महाराष्ट्राने हरयाणाला पराभूत केले नव्हते. पण रविवारी उपांत्य फेरीत बलाढय़ हरयाणाला त्यांच्या भूमीवर हरवू शकलो, याचा अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया उपविजेत्या महाराष्ट्राचे प्रशिक्षक प्रशांत चव्हाण यांनी व्यक्त केली.
भारतीय रेल्वेकडून अंतिम फेरीत २१-३८ असा पराभव पत्करल्यामुळे महाराष्ट्राचे जेतेपद हुकले. पण हरयाणावर मिळवलेल्या ३३-२७ अशा विजयामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय स्पर्धेत दरारा निर्माण केला. या सामन्याबाबत चव्हाण म्हणाले, ‘‘हरयाणाच्या संघातील सर्वच १२ खेळाडू प्रो कबड्डी गाजवणारे होते, तर महाराष्ट्राच्या संघातील फक्त अस्लम इनामदार आणि आकाश शिंदे यांनाच एक-दोन वर्षांचा अनुभव होता. त्यामुळे हरयाणा महाराष्ट्राला आणि नंतर रेल्वेला हरवून जेतेपद जिंकणार, असा जाणकारांचा अंदाज होता. पण सामर्थ्यशाली हरयाणाचे या स्पर्धेतील आधीचे सामने तसेच यू-टय़ूबवरील चित्रफिती पाहून प्रदीप नरवाल, संदीप नरवाल यांच्या खेळाचा व्यवस्थित अभ्यास आम्ही केला होता. बोनस गेले तरी चालतील, पण क्षेत्ररक्षण भक्कम राहिले पाहिजे, हीच रणनीती होती. त्यामुळे हरयाणाला त्यांच्या भूमीवर हरवू शकलो.’’