गुजरातमधील बोताड जिल्ह्यात बनावट आणि विषारी दारू पिऊन ३३ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली.
गुजरातचे पोलीस महासंचालक आशिष भाटिया यांनी गांधीनगर येथे पत्रकारांना सांगितले, की प्राथमिक तपासानुसार, बोताडमधील एका महिलेसह काही जणांनी ‘मिथाइल अल्कोहोल’ (मिथेनॉल) पाण्यात मिसळून बनावट दारू बनवली होती. हे रसायन अत्यंत विषारी असते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही दारू ते ग्रामस्थांना प्रति छोटी पिशवी २० रुपये दराने विकायचे. या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांच्या रक्तनमुन्यात त्यांनी मिथेनॉलचे सेवन केल्याचे निदर्शनास आले आहे. भाटिया यांनी सांगितले, की १४ लोकांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अहमदाबाद गुन्हे शाखाही तपासात सहभागी आहेत.
सोमवारी सकाळी बोताडच्या रोझीद गाव व परिसरातील इतर गावांत राहणाऱ्या काही जणांची प्रकृती खालावल्याने त्यांना बरवाला परिसर आणि बोताड शहरातील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. भाटिया यांनी सांगितले, की आतापर्यंत ३३ जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यापैकी २२ जण बोताड जिल्ह्यातील वेगवेगळय़ा गावांतील रहिवासी आहेत. उर्वरित सहा जण शेजारच्या अहमदाबाद जिल्ह्यातील तीन गावांतील रहिवासी आहेत. याशिवाय भावनगर, बोताड आणि अहमदाबाद येथील रुग्णालयांमध्ये ४५ हून अधिक जणांवर उपचार सुरू आहेत.
त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन
दरम्यान, राज्य सरकारने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की गुजरातच्या गृह विभागाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी वरिष्ठ भारतीय पोलीस सेवा अधिकारी सुभाष त्रिवेदी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे.