“जागतिक स्तरावर अर्थव्यवस्थेसमोर सध्या मोठी आव्हाने आहेत. जगभरातील अनेक देशांना प्रचंड महागाई आणि बेरोजगारीने ग्रासले आहे. या प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे,’’ अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिली. दहा लाखांच्या भरतीसाठी रोजगार मेळाव्यांचा प्रारंभ मोदी यांनी केला. शनिवारी पहिल्या टप्प्यात ७५ हजारांहून अधिक युवकांना विविध सरकारी सेवांचे नियुक्तिपत्र दिल्यानंतर ते बोलत होते. बेरोजगारीच्या मुद्दय़ावरून विरोधकांकडून सातत्याने टीका होत असताना गेल्या आठ वर्षांत नोकऱ्या निर्माण करण्याच्या आपल्या सरकारच्या प्रयत्नांना त्यांनी यावेळी अधोरेखित केले.
मोदी म्हणाले, की जागतिक परिस्थिती फारशी चांगली नाही हे खरे आहे. अनेक मोठय़ा अर्थव्यवस्था अडचणीत आहेत. शतकातून एकदा येत असलेल्या अशा करोनासारख्या महासाथीचे दुष्परिणाम शंभर दिवसांत दूर होतील, असा कुणाचाही भ्रम नाही. तरीही या समस्यांची झळ बसू नये म्हणून भारत अग्रक्रमाने काही प्रयत्न, उपाययोजना करत आहे. प्रसंगी जोखीमही घेत आहे. हे एक आव्हानात्मक काम आहे. परंतु जनतेच्या आशीर्वादाने आम्ही ते आतापर्यंत पार पाडू शकलो आहोत. आपल्या सरकारने अर्थव्यवस्थेला अडथळा ठरणाऱ्या त्रुटी दूर केल्या, म्हणून हे शक्य झाले. आता सरकारी विभागांची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढली आहे. भारताने आठ वर्षांत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून दहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी उत्पादन, पायाभूत सुविधा आणि पर्यटन क्षेत्रांना प्रोत्साहन देण्यासह सरकारने उचललेल्या विविध पावलांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.
युवकांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार अनेक आघाडय़ांवर काम करत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, की उगवत्या उद्योजकांना ‘मुद्रा’ योजनेंतर्गत विक्रमी रकमेचे कर्ज आतापर्यंत देण्यात आले आहे. महासाथीच्या काळात तीन लाख कोटींहून अधिक मदतीमुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील दीड कोटींहून अधिक नोकऱ्यांवरील गंडातर टाळले गेले. तरुणांतील कौशल्य सुधारणांवर सरकारचा भर आहे. सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसह कृषी आणि इतर क्षेत्रांना प्रोत्साहन दिले जात आहे. ‘स्किल इंडिया’अंतर्गत सव्वा कोटींहून अधिक जणांना प्रशिक्षण देण्यात आले.
जूनमध्ये पंतप्रधानांनी विविध सरकारी खात्यांना पुढील दीड वर्षांत विशेष मोहीम राबवून दहा लाख लोकांना नोकऱ्या देण्याचे निर्देश दिले होते. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष (७५ वर्षे) डोळय़ांसमोर ठेवून आपले सरकार आठ वर्षांपासून रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारतर्फे शनिवारी ७५ हजार युवकांना नियुक्तिपत्रे दिली गेली. देशभरातून निवडलेल्या या उमेदवारांना भारत सरकारच्या ३८ खात्यांत रुजू करून घेतले जाईल.