चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या मध्यवर्ती समितीमध्ये राष्ट्राध्यक्ष क्षी जिनिपग यांची फेरनिवड झाली. त्यामुळे आता विक्रमी तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. पंतप्रधान ली केकुचिआंग यांच्यासह अनेक बडय़ा नेत्यांना मात्र या समितीत स्थान मिळालेले नाही.
येथे झालेल्या पंचवार्षिक अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी पक्षाच्या मध्यवर्ती समितीची ‘निवड’ करण्यात आली. यात २०५ नियमित सदस्य असून १७१ पर्यायी सदस्य आहेत. अपेक्षेप्रमाणे जिनिपग यांचेही यात नाव असून त्यामध्ये त्यांच्याच पाठीराख्यांचा भरणा आहे. परराष्ट्रमंत्री वांग यी यांची समितीत फेरनिवड झाली असली तरी पंतप्रधान केकुचिआंग यांच्यासह उपपंतप्रधान हान झेंग, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष ली झनशू यांना वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे सर्व मावळत्या ‘स्थायी समिती’चे सदस्य होते. पक्षाच्या सरचिटणीसपदी फेरनिवड झाल्यानंतर पुढल्या वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये (चीनची संसद) जिनिपग यांना पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनवण्याची औपचारिकता शिल्लक राहील. असे झाल्यास आजीवन राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा त्यांचा मार्गही मोकळा होणार असल्याचे मानले जात आहे.
अशी होईल निवड
रविवारी समितीच्या बैठकीत ‘पॉलिटब्युरो’ हा २५ जणांचा गट निवडला जाईल. या गटातून पक्षाची सर्वशक्तिमान स्थायी समिती निवडली जाईल आणि त्यात सरचिटणीसाची निवड होईल. जिनिपग या पदावर कायम राहिल्यानंतर ते राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवडीपासून केवळ एक पाऊल दूर असतील.
हु जिंताओंचे ‘नाटय़’ : पंचवार्षिक अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी माजी राष्ट्राध्यक्ष हु जिंताओ यांना अचानक व्यासपीठावरून उतरवण्यात आले. ७९ वर्षांचे जिंताओ जिनिपग यांच्या शेजारीच बसले होते. त्यांना अचानक दोघांनी हाताला धरून खाली उतरवले. हे दोघे जण सुरक्षारक्षक असावेत असा अंदाज आहे. जिंताओ यांच्या वर्तनावरून त्यांची जाण्याची इच्छा नसावी असे दिसले. माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर हा प्रकार घडला. याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यांची तब्येत बिघडली की अन्य कारणाने त्यांना बाहेर काढले, हे स्पष्ट होऊ शकले नाही.