भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया टि २० विश्वचषक स्पर्धेत आज पाकिस्तान विरुद्ध श्रीगणेशा करणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा हा सामना मेलबर्नमध्ये होणार असून यापूर्वी शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने आपल्या टी२० विश्वचषकाची तयारी आणि पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्याबाबत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यादरम्यान एका प्रश्नाच्या उत्तरात त्याने दिलेल्या उत्तरातून स्पर्धेदरम्यान भारतीय संघाच्या अंतिम ११ मध्ये बरेच बदल होण्याची शक्यता आहे.
रोहित ने पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की येथे नाणेफेक खूप महत्त्वाची असेल, असे भारतीय कर्णधाराने सांगितले. “मेलबर्नचे हवामान बदलते. तुम्हाला खरंच माहीत नाही की पुढे काय होणार आहे? ४० षटकांचा पूर्ण खेळ लक्षात घेऊन आम्ही मैदानात उतरू, पण त्यापेक्षा कमी खेळ झाला तरी आम्ही त्यासाठीही तयार आहोत.” पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्माला टीम इंडियाच्या प्लेईंग ११ बाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की, प्रत्येक सामन्यातील परिस्थितीनुसार प्लेईंग ११ ठरवली जाईल. तो पुढे म्हणाला की, “प्रत्येक सामन्यात विरोधी संघ, खेळपट्टी आणि हवामान वेगळे असते, त्यामुळे प्लेईंग ११ मध्ये बदल करण्याची गरज वाटत असेल तर ती नक्कीच केली जाईल. रोहित शर्माच्या या विधानानंतर भारतीय क्रिकेटप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत. कारण आशिया चषक २०२२ मध्ये भारतीय संघ लवकर बाहेर पडण्याचं मुख्य कारण म्हणजे प्लेईंग ११ मध्ये सतत होणारे बदल. आता देखील तशीच रणनीती असल्याने क्रिकेटप्रेमी चिंतेत पडले आहेत.
हवामान आणि खेळपट्टी अंदाज
या महामुकाबल्यापूर्वी सामन्यापूर्वी दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर मेलबर्न येथे होणाऱ्या या सामन्यात हवामान खात्याने सर्वप्रथम पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्याच वेळी, सामन्याच्या दिवशी मेलबर्नमध्ये खराब हवामानाची शक्यता होती. मात्र, सध्या मेलबर्नमध्ये बराच वेळ पाऊस थांबला असून जोरदार सूर्यप्रकाश आला आहे. आता भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीही पावसाची शक्यता खूपच कमी आहे.आता मेलबर्नमध्ये पाऊस थांबला असून ऊनही निघाले होते. Weather.com नुसार, मेलबर्नमध्ये २३ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता ८० टक्क्यांहून अधिक होती. त्याचवेळी हवामानात बदल झाल्यानंतर आता येथे पावसाची २५ टक्के शक्यता आहे. खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक आहे.
कधी, कुठं रंगणार सामना?
भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता, लाईव्ह सामना डीडी स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सवर, लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने प्लस हॉटस्टार.
भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद.