राज्यात ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा भर झाली आहे. आज पुणे आणि लातूरमधील प्रत्येकी एका रुग्णाला ओमिक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. पुण्यात दुबईवरुन (Dubai) आलेल्या महिला डॉक्टरचा अहवाल ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांच्या संपर्कातील तीन जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानं थोडासा दिलासाही मिळालाय. महत्वाची बाब म्हणजे पुणे आणि लातूरमधील ओमिक्रॉनची लागण झालेल्या दोघांनीही कोरोना लस घेतलेली होती.
तर लातूर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्णही दुबईवरुन भारतात आला होता. या 35 वर्षीय रुग्णात लक्षणं आढळून आली होती. लातूर महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये या रुग्णावर उपचार सुरू असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली आहे. परदेशातुन आलेल्या 51 पैकी एका रुग्णाचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आल्यानंतर तो रुग्ण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं. दरम्यान या रुग्णाची प्रकृती चांगली असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. हा रुग्ण औसा इथला रहिवासी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
या दोन रुग्णांसह राज्यातील ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. दरम्यान, दिलासादायक बाब ही की ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांपैकी 9 जणांची आरटीपीसीआर चाचणी आता निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. आतापर्यंत राज्यात ओमिक्रॉनचे मुंबईत 5, पिंपरी-चिंचवडमध्ये 10, पुणे महापालिका हद्दीत 2, कल्याण-डोंबिवलीत 1, नागपूरमध्ये 1 आणि लातूरमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.
ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हायरंटचा पहिला मृत्यू झाला आहे. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे. या स्ट्रेनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. 30 पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन करतानाच ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.