आज दि.२० मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

विद्यार्थी रॉक्स बोर्ड शॉक, एकानेच लिहिल्या 372 उत्तरपत्रिका; बारावीच्या परीक्षेत हस्ताक्षर घोटाळा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे. परीक्षेत गैरप्रकार घडू नयेत यासाठी बोर्डाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला आहे. बारावीच्या एका विषयाच्या साडेतीनशेहून अधिक उत्तर पत्रिकांमध्ये एकसारखं हस्ताक्षर आढळलं आहे. यामुळे खळबळ उडाली असून महाराष्ट्रा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ बुचकळ्यात पडलं आहे.बारावीच्या भौतिकशास्त्र विषयाच्या तब्बल ३७२ उत्तरपत्रिकांमध्ये एकाच व्यक्तीचं हस्ताक्षर असल्याचं आढळलं आहे. या सर्व उत्तरपत्रिका बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येतेय. शिक्षण मंडळाकडून नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

क्लास वन सतीश खरेचा थर्ड क्लास कारनामे, घरात आढळली 16 लाखांची कॅश, 54 तोळे सोनं

नाशिकच्या एसीबीने तब्बल 30 लाखांची लाच घेतांना जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी अटक केली. या अटकेनंतर जिल्ह्यातच नाहीतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाल. लाचखोर सतीश खरे यांचं सहकार विभागाने निलंबन देखील केलंय. लाचखोर सतीश खरेचे खोटे कारनामे यानिमित्ताने चर्चेचा विषय बनला आहे.लाचखोर सतीश खरे हा क्लास वन ऑफिसर आणि नाशिक जिल्ह्याचा उपनिबंधक होता. सहकार विभागात खरेचा मोठा दबदबा होता. त्याच्या विरोधात अनेक तक्रारी असतांना त्याच्यावर कारवाई होत नव्हती ही विशेष बाब आहे. सोमवारी याच लाचखोर सतीश खरे कडे नाशिक जिल्ह्यातील चार बाजार समितीच्या संदर्भात दाखल तक्रारीवर सुनावण्या होत्या. त्यामध्ये अनेक उमेदवार तथा विद्यमान संचालकांवर आक्षेप घेण्यात आल्यानं ही सुनावणी होती. त्यामध्ये नाशिक, दिंडोरी, पिंपळगाव बसवंत आणि घोटी या बाजार समितीच्या संदर्भात सुनावणी होती. त्याच दरम्यान एका प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावून देतो म्हणून तीस लाखांची मागणी केली होती. त्यात 30 लाख स्वीकारत असतांना एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.

चौका चौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम राबवला पाहिजे’ राऊतांचा नोटबंदीवरुन घणाघात

चौका चौकात जाहीर फाशीचा कार्यक्रम राबवला पाहिजे, असा घणाघात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नोटाबंदीवरुन केला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं, बेरोजगारी वाढवली, महागाई वाढवली, व्यापार लहान उद्योग बंद पडले, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. यावेळी शिवसेना आणि भाजप हे दोन रक्ताचे भाऊ आहेत, अशी गोपीनाथ मुंडे यांची भूमिका होती. त्यांच्या नंतर ती सगळीच नाती तुटली. ते असते तर कदाचित युती आणि नाती तुटली नसती, अशी खंत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. तसेच पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंचा वारसा टिकवला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे, ही अपेक्षाही व्यक्त केली. यावेळी पुन्हा केलेल्या नोटाबंदीवरही राऊत यांनी टीका केली. महाप्रबोधन यात्रेनिमित्त संजय राऊत बीडमध्ये आले असता त्यांना माध्यमांशी संवाद साधला.

पोलीस भरतीत महाघोटाळा? काँग्रेस आमदाराचा आरोप

मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा 7 मे रोजी मुंबईतील विविध केंद्रांवर पार पडली. मात्र, या भरतीत महाघोटाळा झाल्याचा गंभीर आरोप जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. पोलीस विभागात भरती होण्यासाठी एका-एका उमेदवारांकडून दहा ते पंधरा लाख रुपये घेतले गेल्याचा आरोप आमदार गोरंट्याल यांनी केला आहे. पोलीस भरतीत मोठं रॅकेट असल्याचंही गोरंट्याल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, पोलीस भरतीची फेर परीक्षा घ्या अन्यथा उपोषणाला बसू, असा इशारा कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.

2000 रुपयांच्या नोटांबद्दल माजी प्रधान सचिवांचा मोठा गौप्यस्फोट

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याच्या बाजूने नव्हते, परंतु ते त्यांच्या टीमच्या सल्ल्यानुसार गेले’, असा गौप्यस्फोट पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी केला आहे. मिश्रा यांनी 2016 मध्ये नोटाबंदीचे निरीक्षण केले होते. नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांच्या नोटा चलातून काढून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर न्यूज 18 शी केलेल्या विशेष संभाषणात, त्यांनी स्पष्ट केले की या नोटा काढण्याचा निर्णय नोटाबंदी अजिबात नाही.नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, ‘ही नोटाबंदी नाही तर 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेणे आहे. नोटाबंदीच्या वेळी 2000 रुपयांची नोट चलनात आणण्याची सूचना करण्यात आली होती, जी पंतप्रधानांना आवडली नाही. मात्र, कर्णधार म्हणून आपल्या टीमच्या सल्ल्याने त्यांनी या नोटांना परवानगी दिली. तेव्हा ते अगदी स्पष्ट होते आणि आम्हीही होतो की ही एक अल्पकालीन व्यवस्था असेल.’

CBI कडून समीर वानखेडेंची मॅरेथॉन चौकशी; 15 प्रश्नांची यादी समोर

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची आजची चौकशी संपली आहे. तब्बल पाच तासांच्या सीबीआय चौकशीनंतर उद्या पुन्हा त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी वानखेडेंच्या चौकशीची ही पहिली फेरी असून त्यांना अनेक प्रश्न विचारले जाणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी सांगितले. एक दिवसापूर्वी, मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला वानखेडेंवर 22 मे पर्यंत कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये असे निर्देश दिले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने समीर वानखेडे यांना 15 प्रश्न विचारलेले आहेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जींची अनुपस्थिती

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज सिद्धरामय्यांनी शपथ घेतली. तर उपमुख्यमंत्री म्हणून डीके शिवकुमार यांनी शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा काही वेळापूर्वीच पार पडला. या शपथविधी सोहळ्याला १९ विरोधी पक्षांना बोलवण्यात आलं होतं. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचीही या सोहळ्याला अनुपस्थिती होती.

जी-७ परिषदेतली बायडेन-मोदींची गळाभेट चर्चेत, ऋषी सुनक यांच्याशी असलेल्या मैत्रीचंही दर्शन

जपानच्या हिरोशिमा शहरात आंतरराष्ट्रीय जी-७ शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी झाले आहेत. खरंतर भारत या शिखर परिषदेचा भाग नाही. तरी पंतप्रधान मोदी अतिथी देशाचे प्रतिनिधी म्हणून या परिषदेला उपस्थित राहिले आहेत. या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेतली. तसेच पंतप्रधान मोदी यांनी या परिषदेला उपस्थित असलेल्या अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेतली, तसेच त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली.दरम्यान, जी-७ परिषदेच्या सभागृहात नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांची मैत्री पाहायला मिळाली. दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली. दोघांनी काहीवेळ बातचित केली आणि नंतर परिषदेत सहभागी झाले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मोदी सरकारला ८७,४१६ कोटी रुपये देणार

रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाने केंद्र सरकारला २०२२-२३ आर्थिक वर्षासाठी ८७,४१६ कोटी रुपयांचे लाभांश देण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला आहे. यंदाचा हा लाभांश आधीच्या आर्थिक वर्षातील लाभांश रकमेच्या जवळपास तिप्पट आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये मध्यवर्ती बँकेकडून केंद्राला ३०,३०७ कोटी रुपये लाभांश वितरीत झाला होता. रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त झालेला लाभांश सरकारच्या अपेक्षेपेक्षा अधिक आहे.केंद्र सरकारने अर्थसंकल्पात रिझर्व्ह बँकेकडून ४८,००० कोटी रुपये लाभांश मिळण्याचे अर्थसंकल्पीय लक्ष्य ठेवले होते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात केंद्राला केवळ ३०,३०७ कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यात आला होता, जो ७३,९४८ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा कमी होता.

धोनीच्या चेन्नईची प्लेऑफमध्ये धडक, आयपीएलच्या इतिहासात रचला विक्रम

आयपीएल 2023 मध्ये 67 वा सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पार पडला . यासामन्यात चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून यंदाच्या आयपीएल प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. चेन्नई सुपरकिंग्सने दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच होम ग्राउंडवर 77 धावांनी पराभव केला. यासोबतच चेन्नई सुपरकिंग्स ही आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये पोहोचणारा संघ ठरला आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.