आज दि.२२ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

बोर्डाचा कधीही जाहीर होऊ शकतो निकाल; लवकरच होणार घोषणा

देशातील CBSE आणि ICSE बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कधी जाहीर होतो याकडे सर्व विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. आपली मुलं चांगल्या मार्कांनी पास होतील का? याचं टेन्शन पालकांना आलं आहे. मात्र आता स्टेट बोर्डाचा निकाल नक्की कधी लागणार याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.ताज्या अहवालानुसार, इयत्ता 12वीचा निकाल 25 मे नंतर जाहीर होण्याची अपेक्षा आहे. तर 10वीचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. लवकरच निकालाच्या तारखांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, या परीक्षेला बसलेले विद्यार्थी महाराष्ट्र बोर्ड mahahsscboard.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपासू शकतात.

अजनी वन, कोराडी ते कोल वॉशरी, विदर्भ दौऱ्यात आदित्य ठाकरेंची पर्यावरणासाठी बॅटिंग

शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे विदर्भ दौऱ्यावर आले आहेत. विदर्भात येऊ घातलेल्या अजनी वन, कोराडी वीज प्रकल्प तसंच कोल वॉशरीच्या प्रकल्पांवरून आदित्य ठाकरेंनी पर्यावरणाबाबत चिंता व्यक्त केली. या प्रकल्पांना विरोध करणाऱ्या पर्यावरणवाद्यांनी आदित्य ठाकरेंची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत संवाद साधला. नागपूरच्या अजनी येथे होणाऱ्या मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हबला काही पर्यावरणवादी विरोध करत आहेत, त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांची बैठक झाली.नागपुरात महत्त्वाच्या विषयामध्ये कोराडी प्रकल्प विस्ताराचा विषय आहेच. नांदगाव वारेगावला येऊन गेलो होतो. पुन्हा राखेची साठवणूक सुरू होत आहे. कोल कॉल वॉशरीज विदर्भात वाढत चालली आहे. मी पर्यावरणमंत्री असताना हे थांबवलं होतं. नागपुरातील अजनी वनचा विषय आहे, आम्ही महाविकासआघाडी सरकार असताना अजनी वनला स्थगिती दिली होती, पण आता मल्टी मॉडेलच्या नावाखाली वन संपवलं जाईल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

पिंपरी-चिंचवड पुन्हा हादरलं, भर दिवसा तरुणाची गोळ्या झाडून हत्या

मागच्या काही दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातल्या आणि विशेष करून पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. शहरामध्ये पुन्हा एकदा गोळ्या घालून एका 20 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. चिखली गावामध्ये टाळगाव चिखली कमानीजवळ कृष्णा उर्फ सोन्या तापकीर याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्यामध्ये सोन्याचा जागीच मृत्यू झाला.

शाहरुखसोबतचे चॅट लीक का केले? हायकोर्टाने समीर वानखेडेंना फटकारलं

आर्यन खान प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टाने समीर वानखेडे यांना फटकारलं आहे. शाहरुख खानसोबतचे व्हॉट्सऍप चॅट लीक केल्याप्रकरणी हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. मीडियामध्ये चॅट लीक करण्यासाठी तुम्ही जबाबदार आहात का? असा प्रश्न हायकोर्टाने विचारला. आर्यन खान तुरुंगात असताना समीर वानखेडे आणि शाहरुख खान यांच्यात व्हॉट्सऍपवर चॅटिंग झालं होतं, हे चॅटिंग मीडियाला लीक करण्यात आलं.समीर वानखेडे हे आर्यन खान ड्रग्स प्रकरणातले मुख्य तपास अधिकारी होते. समीर वानखेडे यांच्यावर आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून खंडणी मागितल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला असून याची सुनावणी हायकोर्टामध्ये पार पडली. या प्रकरणी समीर वानखेडे तपासात सहकार्य करत नाहीत, तसंच त्यांनीच शाहरुख खान सोबतचे चॅट लीक केले, असा युक्तिवाद सीबीआयच्या वकिलांनी हायकोर्टात केला.

विरोधकांच्या गाठीभेटीनंतर नितीश कुमार, तेजस्वी यादव यांची आज काँग्रेससोबत बैठक

मागच्या एका महिन्यापासून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव देशभरातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांतील नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या विरोधात एक मजबूत आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जात आहे. सोमवारी दोन्ही नेते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आतापर्यंत भेट घेतलेल्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली त्याचा तपशील काँग्रेसच्या नेत्यांना देणे आणि येत्या काही दिवसांत पटणा येथे विरोधकांचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी सभेची तारीख ठरवणे या दोन मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंढरपुरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

उकाड्याने हैराण झालेल्या पंढरपूरकर वासीयांना पावसाने दिलासा दिला. अचानक सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस तर शहरात हलक्या सरी कोसळल्या. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत.गेले काही दिवस उन्हाचा पारा चाळीशी पार झाला होता. त्यामुळे नागरीक उन्हाने त्रस्त झाले होते. मात्र सोमवारी पाचच्या सुमारास वारे वाहू लागले. पुढे सोसाट्याचा वारा सुटला. शहरात या वार्याने अनेकांची धांदल उडाली. तर आडोसा शोधून थांबले. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. पावसाच्या हलक्या सरी शहरात कोसळल्या. शहरात अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले.

सातारा: पुस्तकांचे गाव भिलार हे देशासाठी आदर्श गाव; राज्यपाल रमेश बैस

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे पुस्तकांचे गाव देशासाठी आदर्श असल्याचे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. राज्यपाल रमेश बैस यांचे साताऱ्यातील महाबळेश्वरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी वाई हेलिपॅडवर आगमन झाले.यावेळी वाई- खंडाळा – महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील व जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख आदी उपस्थित होते.

अतिक अहमदच्या हत्येसाठी लॉरेन्स बिश्नोईने बंदुका पुरवल्या होत्या? एनआयए तपासात धक्कादायक खुलासे

गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेला माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची पोलिसांच्या ताब्यात असताना १५ एप्रिलला गोळ्या झाडून हत्या केली होती. वैद्यकीय चाचणीसाठी प्रयागराज येथील वैद्यकीय महाविद्यालयात नेताना हा हल्ला झाला. याप्रकरणी पोलिसांनी सन्नी सिंह, अरुण सिंह आणि लवलेश तिवारी अशा तिघांना अटक केली होती. अशातच अतिकच्या हत्येसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ( एनआयए ) कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईची चौकशी सुरु आहे. यामध्ये लॉरेन्सने धक्कादायक खुलासे केले आहेत. अतिक अहमदच्या हत्येसाठी तीन हल्लेखोरांना बिश्नोई टोळीतील लोकांनीच बंदुका पुरवल्या होत्या, असं लॉरेन्सने एनआयएला सांगितलं आहे.

पापुआ न्यू गिनी आणि फिजीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा सन्मान, दोन्ही देशांनी सर्वोच्च पुरस्काराने केला गौरव

पंतप्रधान नरेद्र मोदी यांना फिजी देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. फिजीचे पंतप्रधान सितिवेनी राबुका यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मोदी हे जागतिक नेतृत्व असल्याचे सांगत त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. फिजी देशाचा हा सर्वोच्च पुरस्कार फिजीबाहेरच्या केवळ काहीच लोकांना देण्यात आला आहे. नरेंद्र मोदी हे त्यापैकी एक आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ते पापुआ न्यू गिनी या देशात गेले आहेत. दरम्यान, पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे काल (२० मे) स्वतः मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर हजर होते. मोदींचं स्वागत करताना जेम्स मारापे यांनी मोदींच्या पायाला स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मोदींनीही लगेच मारापे यांची गळाभेट घेतली.

धारावीच्या झोपडपट्टीत राहणारी 14 वर्षीय मलिशा बनली आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँन्डचा चेहरा

धारावीच्या झोपडपट्टीत राहणारी मलिशा खरवा सध्या चर्चेत आहे. मलिशा ही फक्त १४ वर्षांची असून ती एका आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रॅन्डचा चेहरा बनली आहे. हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट हॉफमन मुंबईत आला तेव्हा त्याने पहिल्यांदा मलिशाला पाहिले, यानंतर त्याने तिचं सोशल मीडियावर अकाऊंट बनवलं होतं.

मलिशा मुंबईच्या झोपडपट्टीत सर्वसामान्य मुलांसारखी राहत होती पण तिच्या नशिबाने एक सुंदर वळण घेतले आणि ती आता ‘स्लम प्रिन्सेस ऑफ इंडिया’ बनली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.