लिझ ट्रस यांनी मंगळवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी ट्रस यांची या पदावर अधिकृत नियुक्ती जाहीर केल्यानंतर त्यांनी ‘१०, डाऊिनग स्ट्रीट’ या अधिकृत निवासस्थानी पंतप्रधान म्हणून पहिले भाषण केले. यावेळी त्यांनी करकपात करतानाच देशाची अर्थव्यवस्था सावरण्याचे आश्वासन नागरिकांना दिले.
स्कॉटलंडमधील सुटीकालीन निवासस्थानी ट्रस यांनी महाराणी एलिझाबेथ यांची भेट घेतली. तत्पूर्वी मावळते पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी महाराणींकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. आपल्या पहिल्या भाषणात ट्रस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी लादलेल्या युक्रेन युद्धामुळे ब्रिटनमध्ये विजेचे संकट निर्माण झाले आहे. मात्र, आपण त्याचा यशस्वी मुकाबला करू, अशी ग्वाही त्यांनी दिले.
आता ट्रस आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा करतील. अॅटर्नी जनरल सुएला ब्रेव्हरमन या नव्या मंत्रिमंडळातील भारतीय वंशाचा एकमेव चेहरा असण्याची शक्यता आहे. जॉन्सन यांचे विश्वासू, माजी गृहमंत्री प्रीती पटेल आणि माजी अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी ट्रस मंत्रिमंडळात सहभागी होण्यास अप्रत्यक्ष नकार दिला आहे.
मंत्रीमंडळात भारतीय वंशाचा एकमेव चेहरा?
ट्रस मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असलेल्या सुएला ब्रेव्हरमन यांचे आई-वडील भारतीय वंशाचे आहेत. त्यांचे वडील क्रिस्टी यांचा जन्म गोव्यात झाला, तर आई उमा फर्नाडिस यांचा जन्म मॉरिशसमधील तमिळ कुटुंबातला आहे.