आज दि.७ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

हा आमच्या देवाचा अपमान! गणेश मूर्ती विसर्जनावरुन नितेश राणे कोल्हापूर पालिका प्रशासनावर भडकले

कोल्हापूर शहरात गणेश विसर्जनाचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोल्हापूर महापालिकेने गणेश विसर्जनासाठी अनोखी व्यवस्था केली असून इराणी खणीजवळ स्वयंचलित यंत्र उभारलं आहे. यंत्राद्वारे गणेश मूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यात येत आहे. हा वेगळा प्रयोग राज्यात पहिल्यांदाच होत असून तब्बल 83 लाख रुपये खर्चून ही यंत्रणा इराणी खण येथे बसवण्यात आली आहे. कोल्हापूरकरांनी पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करावं, असं आवाहन यावेळी प्रशासक डॉक्टर कादंबरी बलकवडे यांनी केलं आहे. मात्र, यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी आक्षेप घेतला आहे.

एकनाथ शिंदेंच्या नावाने चांगभलं, ग्रामपंचायत निवडणुकीत उभं राहिलं पॅनल!

शिवसेनेमध्ये बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेनेच्या पक्ष चिन्ह धनुष्यबाण मिळवण्यासाठी शिंदे गटाची धावाधाव सुरू आहे. पण, यवतमाळमध्ये शिंदे गटाला चिन्ह सुद्धा मिळाले आहे. चक्क शिंदे गटाच्या नावावर ग्राम पंचायत निवडणूक लढवली जात आहे.

शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अनेक पक्षाचे नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील येत्या 18 सप्टेंबर रोजी 73 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य या पदासाठी निवडणूक होत आहे. त्या दृष्टीने गाव पुढारी कामाला लागले असून राज्यातील शिंदे गटाच्या नावावर ही निवडणूक लढविली जात आहे. या निवडणुकीत एकूण 11 सदस्य आणि सरपंचासाठी थेट जनतेतून निवडणूक होत आहे.

दिव्यांग कलाकारानं साकारला चक्क क्रिकेटच्या साहित्यापासून ‘गणपती’

गणेशोत्सव काळात आपणाला निर्गुण निराकार असलेल्या बाप्पांची विविध रुप आणि आकारातील मूर्ती पहावयास मिळतात. कुणी पुस्तकांचा गणपती बनवितो, तर कुणी आणखी कशापासून गणपती बनवितो. परंतु, अकोल्यातील एका दिव्यांग कलाकाराने चक्क क्रिकेटच्या साहित्यापासून गणेश मूर्ती साकारली आहे. या आगळ्यावेगळ्या बाप्पाच्या मूर्तीला पाहण्यासाठी भक्तांची गर्दी होत आहे. 

अकोला शहरातील वीर भगतसिंग गणेश मंडळ मणकर्णा प्लाॅट यांचे यंदा 53 वे वर्ष आहे. या वर्षी गणेश मंडळाने क्रिकेटच्या साहित्यापासून गणपती साकारला आहे. या अगोदर पेन्सिल, नोटा, बांगड्या, बिस्कीट यापासून मूर्ती तयार केल्या आहेत. यंदा क्रिकेटच्या साहित्यापासून गणेश मूर्ती साकारली असून ही मूर्ती चिखलदरा येथील संग्रहालयात ठेवली जाणार आहे.

मनसे आणि भाजपची युती कधी होणार? चंद्रशेखर बावनकुळेंचं सूचक विधान

शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप आणि मनसेची जवळीक वाढत चालली आहे. त्यामुळे भाजप आणि मनसे युतीची चर्चा रंगली आहे. पण, ‘राज ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासंदर्भात आज कुठलीही चर्चा नाही, जसे जसे दिवस पुढे जातील तशी तशी चर्चा होईल, असं सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

विरोधकांचं ‘मिशन 2024’, पंतप्रधानपदाचा चेहरा कोण?

बिहारमध्ये सुरू झालेल्या राजकीय बदलांचे परिणाम आता केंद्रातल्या राजकारणातही दिसू लागले आहेत. दिल्ली दौऱ्यावर असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची भेट झाली. दिल्ली दौऱ्यावर असलेले नितीश कुमार कालपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यामध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सिताराम येचुरी, डी.राजा, शरद पवार यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

नितीश कुमार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे केंद्रीय पातळीवर बनत असलेल्या नव्या समिकरणाला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे, पण 2024 साली विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरद पवारांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार यांना हाच प्रश्न विचारण्यात आला, पण त्यांनी यावर थेट उत्तर द्यायचं टाळलं.

मृत्यूनंतरही भोग सरेना, नदीत गुडघाभर पाण्यातून निघाली अंत्ययात्रा, सोलापुरातील धक्कादायक प्रकार

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही अनेक ठिकाणी हव्या तशा सोयी सरकारकडून पोहोचलेल्या नाहीत. अनेक भागांमध्ये विकास पोहोचलेला नाही. त्या भागाचा हवा तसा विकास झालेला नाही. सोलापूर जिल्ह्याच्या एका गावातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावाच्या बाजूला असलेल्या नदीला पूल नसल्यामुळे गावकऱ्यांना अंत्ययात्रेसाठी गुडघाभर पाण्यातून वाढ काढावी लागली. विशेष म्हणजे नदीच्या पाण्याच्या पातळी कमी व्हावी यासाठी दफनविधीसाठी एक दिवस वाट पाहावी लागली. त्यानंतर पाण्यातून वाट काढून दफनविधी करावी लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; इतर देशांमध्ये पुढील शिक्षण पूर्ण करता येणार!

नॅशनल मेडिकल कमिशनने युक्रेनमधून परतलेल्या भारतीय वैद्यकीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. NMC ने युक्रेनच्या ‘मोबिलिटी प्रोग्राम’ला मान्यता दिली. त्यामुळे असे सर्व विद्यार्थी आता इतर देशांच्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे पुढील शिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार एनएमसीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या आदेशाचा अर्थ असा नाही की विद्यार्थ्यांना भारतातील महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रम सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाईल. तर, हे त्या विद्यार्थ्यांसाठी लागू होणार आहे, ज्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये नवीन नियम लागू झाल्यानंतर युक्रेनमधील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवला होता.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.