” मोती साबणाने स्नान करा ” सांगणारे काका कालवश

मराठी प्रेक्षकांना ज्या जाहिरातीनं वेडं केलं ती म्हणजे दिवाळीच्या वेळची मोती साबणाची जाहिरात. या सणाच्या वेळी हमखास ही जाहिरात पाहायला मिळायची. त्यातील तो संवाद हमखास कानावर यायचा.

गेल्या अनेक वर्षांपासून या जाहिरातीनं एक वेगळा भावनिक बंध तयार झाला होता. त्या जाहिराती संदर्भातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्या जाहिरातीमध्ये काम करणाऱ्या एका ज्येष्ठ कलाकाराचे निधन झाले आहे. ते अभिनेते म्हणजे विद्याधर करमरकर. ते करमरकर काका म्हणून प्रसिद्ध होते. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. २० सप्टेंबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केवळ मराठीच नाहीतर हिंदीतील काही चित्रपट आणि जाहिरांतीमध्ये देखील त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या जाण्यानं मराठीतील काही सेलिब्रेटींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. विद्याधर करमरकर लोकप्रिय होण्यास महत्वाची ठरली ती त्यांनी केलेली मोती साबणाची जाहिरात. उठा उठा मोती साबणाची वेळ झाली. ही टॅगलाईन करमरकर काकांच्या तोंडी होती. अजूनही ही जाहिरात प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. मात्र यावर्षीच्या दिवाळीत काकांची उणीव प्रेक्षकांना जाणवल्याशिवाय राहणार नाही. विद्याधर करमरकर हे हिंदी चित्रपट अभिनेते म्हणूनही नावाजले गेले.

त्या जाहिरातीत पहाटेच्या वेळी दार वाजवून सर्वांना उठवणारे आजोबा दुसरे तिसरे कोण नसून ते ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर हे होते. ते त्यांच्या परिचयामध्ये आबा या नावानं प्रसिद्ध होते. मुंबईतील विलेपार्ले येथे वास्तव्याला होते. सुरुवातीच्या काळात नोकरी करून त्यांनी आपली अभिनयाची आवड जपली. त्यांनी मोती साबण, इंडियन ऑइल, पेप्सीगोल्ड, हेन्ज टोमॅटो केचप, लिनोवो कंप्युटर्स, एशियन पेंट या जाहिरातींमध्ये काम केले. याशिवाय कार्तिक कॉलिंग कार्तिक, गेम विथ अनुपम खेर, दोस्ती यारीयां मनमर्जीया, सास बहु और सेन्सेक्स, लंच बॉक्स, एक थी डायन, एक व्हिलन या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.