आज दि.२१ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

जिथे जिथे हिंदूंची संख्या कमी आहे,
तिथे समस्या निर्माण झाल्या : भागवत

वेगवेगळ्या कारणांमुळे जिथे जिथे हिंदूंची लोकसंख्या कमी झाली आहे तिथे समस्या निर्माण झाल्यात, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केलं आहे. याच कारणामुळे संघ हा सर्वव्यापी होऊन जागतिक कल्याणाबद्दल चर्चा करणार असल्याचं भागवत म्हणाले आहेत. हिंदू राष्ट्राच्या परम वैभवामुळे जगाचं कल्याण होईल, असा विश्वासही भागवत यांनी व्यक्त केलाय. करोना कालावधीमध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी केलेली निःस्वार्थ सेवा म्हणजेच हिंदूत्व आहे, असं भागवत यांनी यावेळी हिंदूत्वाची व्याख्या सांगताना म्हटलं.

हिंदू धर्माला कथित धोक्यांशी
संबंधित सर्व दावे केंद्राने फेटाळले

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने हिंदू धर्माला असलेल्या कोणत्याही कथित धोक्यांशी संबंधित सर्व दावे फेटाळून लावले आहेत, अशा आशंका केवळ ‘काल्पनिक’ असल्याचे नमूद केले आहे. अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाने (एमएचए) स्पष्टपणे म्हटले आहे की, हिंदू धर्माला तथाकथित ‘धमक्या’ देण्याबाबत त्याच्याकडे कोणतेही रेकॉर्ड किंवा पुरावे नाहीत, असे नागपुरातील कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांना दिलेल्या आरटीआयच्या उत्तरात म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे
विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दोन दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याचे निर्देश दिले आहेत. या अधिवेशनात राज्यातील महिलांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात यावी, असं राज्यपालांनी राज्य सरकारला सांगितलं आहे. यासंदर्भात राज्यपालांनी पत्र पाठवून मुख्यमंत्र्यांना निर्देश दिले आहेत.

संसदेचे विशेष सत्र
बोलवावे : मुख्यमंत्री

साकीनाक्यातील घटनेने राज्यपाल म्हणून आपण महिलांवरील अत्याचारांबाबत चिंता व्यक्त केली. हीच चिंता आम्हालाही आहेच. हा विषय साकीनाक्यापुरता मर्यादित नसून राष्ट्रव्यापी आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील पीडित महिला आपल्याकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. म्हणून राष्ट्रातील महिला अत्याचारांना तोंड फोडण्यासाठी संसदेचे चार दिवसांचे विशेष सत्र बोलवावे, अशी मागणी राज्यपाल महोदयांनी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांकडे करावी. त्याच सत्रात साकीनाका घटनेवरही चर्चा करता येईल”, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी या पत्रामध्ये केली आहे.

पंतप्रधान मोदी अमेरीका दौऱ्यावर

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधनासह जगातील नेत्यांची भेटही मोदी घेणार आहेत.

संयुक्त राष्ट्राच्या आमसभेच्या ७६ वे सत्र १४ सप्टेंबरपासून सुरु झाले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी २५ सप्टेंबरला संबोधन करणार आहे.
त्यानिमित्त पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. मंगळवारी ते अमेरिका दौऱ्यासाठी रवाना होतील. यात संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला संबोधनासह जगातील नेत्यांची भेटही मोदी घेणार आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेसाठी जगातील जवळपास १०० देशांचे प्रमुख अमेरिकेत उपस्थित असणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सहभागी होण्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची २४ सप्टेंबरला भेट घेणार आहेत. बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे.

अनंत गिते पडले एकटे,
शिवसेनेने झटकले हात…

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गिते यांनी रायगड येथे एका कार्यक्रमात भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली.
या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर पलटवार केला. अनंत गिते यांनी केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या संपूर्ण प्रकरणावर शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आली आहे. अनंत गिते यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी म्हटलं, मला विषय माहित नाही, पवार साहेब आणि ठाकरे राज्याचे नेते आहेत.

कल्याण – डोंबिवलीत 540 गरोदर महिलांचे कोरोना लसीकरण

बाळाला स्तनपान करते…गरोदर आहे तर कोरोना प्रतिबंधक लस कशी घ्यावी असा प्रश्न आजही अनेक महिलांच्या मनात आहे. त्यातही कल्याण डोंबिवलीत 540 गरोदर महिलांनी व 148 स्तनदा मातांनी लस घेतली आहे.
गरोदर महिला, स्तनदा माता यांच्या लसीकरणासाठी खासगी रुग्णालयांतच सुविधा करण्यात आली असून आत्तापर्यंत कोणालाही काही त्रास झालेला नाही. यामुळे महिलांनी मनात कोणतीही भीती न बाळगता लस घ्यावी असे आवाहन पालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

फेब्रुवारीपासून सीमेपलीकडून
शस्त्रसंधीचे उल्लंघन नाही

फेब्रुवारीपासून काश्मीरच्या खोऱ्यात सीमेपलीकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झालेले नाही. या वर्षभरात दहशतवाद्यांनी घुसखोरीचे फक्त दोनच यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यातील एक म्हणजे रविवारी उरी सेक्टरमध्ये झालेली घुसखोरी होय. यामध्ये लष्कराचा एक जवान जखमी झाला होता, असे काश्मीरमधील लष्कराच्या सर्वोच्च कमांडर लेफ्टनंट जनरल डी पी पांडे यांनी सांगितले.

सीआयए अधिकाऱ्याला हवाना
सिंड्रोम झाल्याचे उघड

या महिन्याच्या सुरुवातीला भारतभेटीसाठी आलेल्या एका सीआयए अधिकाऱ्याला हवाना सिंड्रोम झाल्याची माहिती समोर आली आहे. हवाना सिंड्रोम भारतात आढळल्याचं हे पहिलंच प्रकरण आहे. लागण झालेले अमेरिकन अधिकारी सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांच्या शिष्टमंडळाचा भाग होते. भारतात मुक्कामी असताना वैद्यकीय मदत घ्यावी लागली, असे सीएनएन आणि एनवायटीवरील अहवालात म्हटले आहे.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसच्या व्हिएतनाम भेटीला उशीर झाल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

तालिबानी राज्यात आयपीएल प्रसारणावर बंदी

अफगाणिस्थानचा कब्जा घेऊन सरकार स्थापन केल्यावर तालिबानने आयपीएल २०२१ च्या प्रसारणावर देशात बंदी घातली आहे. तालिबानी शासन आल्यावर त्यांचे नियम आणि कायदे देशात लागू झाले आहेत. आयपीएल मध्ये गैर इस्लामी प्रकार असल्याचे कारण या बंदीमागे दिले गेले आहे.
आयपीएल २०२१ चा दुसरा टप्पा युएई मध्ये रविवार पासून खेळला जात आहे. जगातील लोकप्रिय अश्या या टी २० लीग मध्ये जगभरातील नामवंत क्रिकेटपटू खेळत असतात. या स्पर्धेत अफगाणी खेळाडू सुद्धा सामील आहेत मात्र अफगाणी नागरिक आपल्या देशाच्या खेळाडूंचा खेळ पाहू शकत नाहीत.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे
अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

प्रयागराजमधील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, पोलिस तपासा दरम्यान नरेंद्र गिरी महाराज यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. ही सुसाईड नोट तब्बल 7 पानी असल्याचं कळतंय. तसंच या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी यांच नाव लिहिल्याचं समोर आलं आहे.

अॕमेझॉन वर मल्याळम, तेलुगू,
बंगाली भाषांमध्ये व्यवसायाची संधी

सणासुदीच्या आधीच मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॕमेझॉनने आपल्या विक्रेत्यांना भेट दिलीय. विक्रेते आता Amazon.in मार्केटप्लेसवर मल्याळम, तेलुगू आणि बंगाली या तीन भाषांमध्ये त्यांचा ऑनलाईन व्यवसाय नोंदणी आणि व्यवस्थापित करू शकतील, अशी माहिती कंपनीने दिली.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.