नागपूरमध्ये सुरू असलेल्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. या शुक्रवारी हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजणार आहे. महाराष्ट्रात जून महिन्यात राजकीय भूकंप झाला, त्यानंतर सरकार स्थिरावल्यानंतरचं हे पहिलंच एवढ्या कालावधीचं अधिवेशन आहे, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरणार हे निश्चित मानलं जात होतं. पण या अधिवेशनात एकनाथ शिंदेंचेच मंत्री अडणीत आले, भाजप सेफ राहिली तसंच अजितदादा आक्रमक दिसले का? उद्धव ठाकरेंची शिवसेना कुठे होती? या चर्चा सुरू झाल्या आहेत.
एकनाथ शिंदेंचे 4 मंत्री अडचणीत
अधिवेशन सुरू झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीची बैठक झाली, या बैठकीत सरकारला घेरण्याची रणनीती ठरली. यानंतर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एनआयटीच्या भुखंडावरून विरोधकांनी एकनाथ शिंदेना अडचणीत आणलं. विधानपरिषदेमध्ये शिवसेनेने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेच्या अंबादास दानवे यांच्याकडे आहे. विधानसभेमध्ये मात्र एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी झाली नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी आमदारांच्या निधीचा मुद्दा उपस्थित केला.
अजित पवारांच्या या भूमिकेबाबत उद्धव ठाकरे यांनाही विचारण्यात आलं, तेव्हा हा मुद्दा उद्याच्या कामकाजात घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचणीत आणल्यानंतर अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात विरोधकांनी त्यांचा मोर्चा अब्दुल सत्तार यांच्याकडे वळवला. अजित पवार यांनी विधानसभेत अब्दुल सत्तार यांच्यावर दोन प्रकरणांमध्ये गंभीर आरोप केले. यातला पहिला आरोप अब्दुल सत्तार यांनी गायरान जमीन अनधिकृतरित्या एका व्यक्तीला दिल्याचा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला. एवढ्यावरच अजित पवार थांबले नाहीत तर त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात सिल्लोड महोत्सव आयोजित करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना 15 कोटी रुपयांचं टार्गेट दिल्याचा आरोप अजित पवारांनी केला. या प्रकरणी अजित पवारांनी अब्दुल सत्तार यांचा राजीनामाही मागितला.
मंगळवारी आणखी दोघं अडचणीत
यानंतर मंगळवारी शिंदेंचेच आणखी दोन मंत्री दादा भुसे आणि शंभुराज देसाईदेखील अडचणीत आले. दादा भुसे यांनी तरुणाला अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याचा आणि मारल्याचा व्हिडिओ समोर आला. तर शंभुराज देसाई यांच्यावर महाबळेश्वरमध्ये शेत जमिनीवर अवैध बांधकाम केल्याचा आरोप करण्यात आला.
भाजप सेफ?
हिवाळी अधिवेशनामध्ये विरोधकांचं संपूर्ण आक्रमण हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांवरच होताना दिसत आहे. या संपूर्ण अधिवेशनामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
दादांच्या मनात काय?
अधिवेशनाच्या सुरुवातीला नागपूर एनआयटी भुखंडाचं प्रकरण न घेणाऱ्या अजित पवारांना आठवड्याच्या शेवटी मात्र दिलगिरी व्यक्त करावी लागली, त्याला कारण ठरलं जयंत पाटलांचं वक्तव्य. जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं, यानंतर त्यांचं निलंबन करण्यात आलं. जयंत पाटलांच्या या विधानाबाबत अजित पवारांनी सभागृहात दिलगिरी व्यक्त केली. जयंत पाटलांचं निलंबन आणि अजितदादांनी घेतलेल्या या भूमिकेबाबत शरद पवार नाराज झाल्याच्या बातम्याही आल्या, पण अजित पवारांनी मात्र शरद पवार नाराज झाल्याच्या बातम्या फेटाळून लावल्या.
ठाकरेंची शिवसेना कुठे?
अधिवेशनाच्या सुरूवातीलाच एकनाथ शिंदेंवर आरोप करून ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमकता दाखवून दिली, पण त्यानंतर सत्ताधारी आमदारांकडून दिशा सालियान मृत्यू प्रकरण बाहेर काढत आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला. या अधिवेशनामध्ये स्वत: उद्धव ठाकरेही सहभागी झाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून त्यांनी विधानपरिषदेमध्ये भाषणही केलं.
संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांनी शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांना अडचणीत आणण्यासाठी रसद कोण पुरवतंय? असा प्रश्न उपस्थित करत भाजपवरच संशय व्यक्त केला.
एकनाथ शिंदे आणि त्यांचे अडचणीत आलेले मंत्री, विधानसभेमध्ये विरोधी पक्ष म्हणून अजितदादांचं एकहाती वर्चस्व, एकही आरोप न होता भाजपला मिळालेलं कवच आणि एनआयटी प्रकरण वगळता न दिसलेला ठाकरे गट याचीच चर्चा नागपुरात सर्वाधिक रंगली.