राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या पक्षावर जोरदार घणाघात केला. नागपूरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका केली. बंडखोर शिंदे गटावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “दगा फटका आपल्याला नवीन नाही. अजातशत्रू हा शब्द बाळासाहेबांना आवडत नव्हता. ज्यांना कमाई करणं आवडत नाही ते चोरतात. वडिलांचे नाव, चिन्ह चोरी करू शकता पण हिम्मत नाही चोरी करू शकत.”
सामन्याला समोर या मग दाखवतो खर खोटं काय अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान दिलं. तसंच शिंदे गटाने बाळासाहेबांचं नाव चोरलं, इतकंच काय तर मी काढलेले बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होर्डिंग्जवर लावत असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
शिंदे गटाच्या नेत्यांवर नागपूरमधील हिवाळी अधिवेशनात गंभीर असे आरोप केले जात आहेत. याबाबत उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, शिंदे गटाचे भ्रष्टाचार कसे बाहेर येत आहेत? भाजप तर याला टाचणी लावत नाही ना हा विचार आहे.” संजय राऊत बॉम्ब फोडणार होते असं खोचकपणे विचारलं जातंय यावर उद्धव ठाकरेंनी म्हटलं की, “मग रोज काय फुटतंय?”
शिंदे गटाला आव्हान देताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार नाही हे यांनी जाहीर करावं लागणार आहे. राजकीय आयुष्यातली ही शेवटची लढाई असून यापुढे विजयाची सुरुवात असेल. आपल्याच लोकांनी पाठीत वार केल्याची खंतही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणावेळी मोदींनी जनतेचे पैसे लुटणाऱ्या लोकांना एक्सपोज करा म्हटलं. पण मग त्यांच्या बाजूला कोण बसल होत? पंतप्रधान एकटे प्रामाणिक असतील पण बाजूला भ्रष्टाचार करणारे बसले होते असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.