देशभर उद्रेक घालणाऱ्या कोरोना व्हायरसने उत्तर प्रदेशात उच्छाद मांडल्याचं चित्र आहे. कारण उत्तर प्रदेशात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत तब्बल चार आमदारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. माजी मंत्री आणि भाजपचे विद्यमान आमदार दाल बहादूर कोरी (Dal Bahadur Kori) यांचं कोव्हिड 19 ने निधन झालं आहे.
दाल बहादूर कोरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना एक आठवड्यापूर्वी लखनऊमधील (Lucknow) अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
कोरोनानं भाजपच्या चार आमदारांचं निधन
कोरोनामुळे यूपीत मृत्यू झालेल्या आमदारांची संख्या चारवर पोहोचली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट सुरु झाल्यानंतर आतापर्यंत भाजपच्या चार आमदारांचं निधन झालं आहे. यापूर्वी आमदार केशर सिंह गंगवार औरेयाचे भाजप आमदार रमेश दिवाकर आणि लखनऊ पश्चिमचे आमदार सुरेश श्रीवास्तव यांचा समावेश आहे. यानंतर आज आमदार दाल बहादूर कोरी यांचीही प्राणज्योत मालवली.
गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. सलग दुसऱ्या दिवशी 24 तासातील कोरोना रुग्णसंख्येने चार लाखांचा टप्पा ओलांडला. गेल्या 24 तासात भारतात 4 लाख 14 हजार 188 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. म्हणजेच आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात जवळपास दोन हजारांनी वाढ झाली आहे. तर 3 हजार 915 रुग्णांना प्राण गमवावे लागले. आधीच्या दिवशी भारतात एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबळींची ( 3 हजार 980) नोंद झाली होती.