बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कोरोना काळात परप्रांतिय मजुरांसाठी देवदूत ठरला. 2020 मध्ये सोनूने अनेक कामगार, मजुरांना त्यांच्या गावी, घरी पोहोचण्यासाठी मोलाची मदत केली. इतकंच नाही तर अनेक गरजूंची भूक भागवण्याचं कामही त्याने केलं आहे. आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शन आणि व्हेंटिलेटरचा मोठा तुटवडा भासतोय. गरजू आणि गंभीर रुग्णांना ते वेळेत मिळवून देण्याचं काम सोनू सूद करतोय. अशावेळी सोनू सूदने भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाचीही मदत केली आहे.
सुरेश रैना यांनी एक ट्वीट करत मेरठमध्ये राहणाऱ्या आपल्या मावशीला ऑक्सिजनची नितांत गरज असल्याचं सांगितलं. रैनाने ट्वीटमध्ये लिहिलं की, 65 वर्षीय मावशीवर फुफ्फुसातील संसर्गावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिला ऑक्सिजनची गरज आहे. त्यावर सोनू सूदने 10 मिनिटांत ऑक्सिजन सिलिंडर पाठवत असल्याचं सांगितलं.
सुरेश रैनाने आपल्या ट्वीटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केलं होतं. सुरेश रैनाचं ट्वीट पाहताच सोनूने तातडीने त्यावर रिप्लाय देत 10 मिनिटात आपण ऑक्सिजनची व्यवस्था करत असल्याचं सांगितलं. कोरोनाचं संकट काळात सोनू सूद सातत्याने देशभरातील जनतेच्या मदतीला धावून जात आहे. स्वत: सोनूलाही कोरोनाची लागण झाली होती. त्या काळात सोनू होम क्वारंटाईन होता. त्यावेळीही त्याने लोकांची मदत करण्याचं काम सुरुच ठेवलं. आता कोरोनामुक्त झाल्यावर सोनू पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी मैदानात उतरला आहे.
सोनू सूद सातत्याने अनेकांच्या मदतीला धावून जात असल्यामुळे अनेकजण अवाक झालेत. काही दिवसांपूर्वी असाच एक अनुभव आलाय. नागपूरमधील एका तरुणीने वडिलांना कोरोना संसर्ग झाल्याचं सांगत व्हेंटिलेटर मिळत नसल्याची अडचण सांगितली आणि सोनू सूद यांच्याकडे मदत मागितली. यावर सोनू सूद यांनी तात्काळ तिला आधार देत मदतीचं आश्वासन दिलं.