रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी केंद्र सरकारकडे इस्रायली टीमला भारतात बोलावण्यासाठी विशेष परवानगी मागितलीय. ही इस्त्रायली टीम भारतात येऊन रॅपिड कोविड 19 आयडेंटिफिकेशन सोल्युशनची स्थापना करेल. यामुळे देशात कोरोना चाचणी सोपी आणि वेगवान होईल. तसेच कंपनी यासाठी लोकांना प्रशिक्षणही देईल. रिलायन्स इंडस्ट्रीजने इस्त्रायली स्टार्टअप कंपनी ब्रॅथ ऑफ हेल्थ (BoH) कडून 1.5 कोटी डॉलर्समध्ये हे सोल्युशन खरेदी केलंय.
रिलायन्सच्या अर्जावर ब्रीथ ऑफ हेल्थच्या प्रतिनिधी मंडळाला इस्रायलकडून तातडीची मान्यता मिळालीय. त्यामुळेच भारतात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे रिलायन्सला त्वरित ही वेगवान चाचणी प्रणाली बसवायची आहे. इस्रायलने आपल्या नागरिकांना 7 देशांमध्ये जाण्यास बंदी घातलीय. यामध्ये भारताचाही समावेश आहे. इस्त्रायली वैद्यकीय तंत्रज्ञान कंपनीचे तज्ज्ञ रिलायन्सच्या टीमला भारतात ही प्रणाली चालवण्यास शिकवणार आहेत. कोरोना व्हायरस कॅरिअर आणि रुग्णांना ओळखणारी ही प्रणाली देशात संक्रमणाची गती कमी करण्यात उपयुक्त ठरू शकते. असे सांगितले जात आहे की, या माध्यमातून कोरोना चाचणीचे निकाल काही सेकंदात मिळतील.
रिलायन्सने जानेवारी 2021 मध्ये ब्रीथ ऑफ हेल्थ बरोबर 1.5 कोटी डॉलर्सचा करार केला होता. त्याअंतर्गत रिलायन्सला स्विफ्ट कोविड 19 ब्रीथ टेस्टिंग सिस्टम मिळणार आहे. करारानुसार रिलायन्स या इस्रायली स्टार्टअप कंपनीकडून कोरोना व्हायरस टेस्ट किट खरेदी करणार आहे. या वेगवान चाचणी मशीनद्वारे दरमहा दहा लाख डॉलर्स खर्च करून कोट्यवधी लोकांची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्टनुसार, बीओएचने श्वासोच्छ्वासाची तपासणी यंत्रणा तयार केलीय, ज्यामध्ये कोविड 19 च्या संसर्गाची तपासणी करण्याचे यशस्वी प्रमाण 95 टक्क्यांहून अधिक आहे.
बीओएचच्या या यंत्रणेच्या क्लिनिकल चाचणीमध्ये असे दिसून आले आहे की, प्रमाणित पीसीआर चाचणीच्या तुलनेत हिचा यशाचा दर 98 टक्के आहे. इस्राईलमधील हदाश मेडिकल सेंटर आणि सेवा मेडिकल सेंटर येथे यासाठी प्रयत्न केले गेलेत. बीओएचची वेगवान चाचणी किट भारतात पोहोचलीत. त्याचे कार्य सुरू केल्यानंतर भारतातील कोरोना संसर्गाच्या प्रकरणांवर विजय मिळविण्यास मोठी मदत होऊ शकते. इस्त्रायली आरोग्य उपमंत्री योव किश यांनी बीओएचच्या प्रयोगशाळेत जाऊन या मशीनशी संबंधित तयारीचा आढावा घेतला होता. 1 आठवड्यापूर्वी भारतात दाखल झालेली ही यंत्रणा लवकरच स्थापित केली जाणार आहे.