अश्लील चित्रपट निर्मिती रॅकेट प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेतर्फे सध्या चौकशी सुरु आहे. आणखी बऱ्याच जणांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. उद्योजक राज कुंद्रा आणि रेयान थोरपे यांच्याकडून अनेक महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि कागदपत्रंही छापेमारी दरम्यान सापडली आहेत. म्हणून त्याची चौकशी केली जात असून सायबर विशेषज्ज्ञ आणि फॉरेन्सिक एक्स्पर्टची मदतसुद्धा घेतली जात आहे .
अश्लील चित्रपट प्रकरणात राज कुंद्रा आणि रेयान थोरपे या दोघांची पुन्हा कस्टडी गुन्हा शाखेतर्फे मागितली जाणार आहे. कारण दोघांच्या कस्टडीची मुदत आज संपत आहे. गुन्हे शाखेच्या माहितीप्रमाणे अजूनही बऱ्याच तांत्रिक आणि आर्थिक मुद्द्यांवर या दोघांची चौकशी करणे बाकी आहे. त्यामुळे पुन्हा कोर्टात गुन्हे शाखा दोघांच्या पुढील कस्टडीची मागणी करणार आहे .
मुंबई हायकोर्टात राज कुंद्रा आणि रेयान थोरपे यांच्या अटकेविरोधात दोन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दोन्ही याचिकांवर आजच हायकोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकेत असं म्हटलं गेलं आहे की राज कुंद्रा आणि रेयान या दोघांना 41 A ची नोटिस न देता अटक केली गेली आहे. म्हणून ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. कोर्टात यावर काय निर्णय होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे .
या प्रकरणात मोठी आर्थिक उलाढाल झालेली आहे. म्हणूनच मनी ट्रेलची (आर्थिक उलाढाल) चौकशी करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेतर्फे अधिकृतपणे आर्थिक लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अधिकृत आर्थिक लेखा परीक्षक कंपनीची आर्थिक लेखाजोखा, कागदपत्रे, डेटा एंट्री, रोख प्रवाह, बॅलेन्स शीट आणि इतर आर्थिक बाजू तपासणार आहेत.
अश्लील चित्रपट रॅकेटच्या मुद्द्यावर अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवण्यासाठी राज कुंद्राला पोलीस त्याच्या घरी घेऊन गेले होते. तेव्हा शिल्पा आणि राज कुंद्रा या दोघांमध्ये पोलिसांसमोरच जुंपली. इतकी सगळी लफडी केली पण मला काही कळू दिलं नाहीस, असं शिल्पा म्हणाली होती. एवढंच नव्हे तर त्यानंतर रडत रडतच तिने स्टेटमेंट दिलं होतं. या प्रकरणी फेब्रुवारीमध्ये जेव्हा अश्लील चित्रपट प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता, तेव्हाही शिल्पा आणि राज कुंद्रामध्ये भांडण झालं होतं. या प्रकरणामुळे शिल्पाची प्रतिमा फारच मलिन झाली असल्याची तिला खंत आहे. आतापर्यंतच्या तपासात यामध्ये शिल्पा शेट्टीचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती समोर आलेली नाही, असे गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती आहे.