आज दि.२६ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

३१ बेपत्तांना मृत घोषित
करत शोधकार्य थांबवले

पावसाने धो-धो कोसळायला सुरूवात केली अन् दरडीच्या आडोशाला दबा धरुन बसलेल्या काळाने संधी साधली. ३५ घरं असलेल्या तळीये गावात मृत्यूनं अक्षरशः तांडव घातलं. बाळसं धरणाऱ्या चिमुकल्या जिवांपासून ते त्यांना खेळवण्यासाठी आसुरलेल्या वृद्धांवर काळाने झडप घातली. दगड मातीच्या ढिगाऱ्याने तळीयेतील अनेक जिवांचा घास घेतला. अचानक कोसळलेल्या संकटानं तळीये गावाचे हुंदके अजूनही थांबलेले नाहीत, पण डोळ्यातील आसवं थिजले आहेत. शोध मोहिमेदरम्यान मातीतून काढले जाणारे मृतदेह आणि त्यांची होत असलेली विटंबना पाहून ग्रामस्थांचं काळीज हेलावलं आणि त्यांनी ढिगाऱ्याखाली गाडलेल्या जिवलगांच्या परतीची आशाही सोडली. हुंदके आवरत ग्रामस्थांनी प्रशासनाला विनवणी केली आणि प्रशासनानं ३१ बेपत्तांना मृत घोषित करत शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेतला.

कारगिल युद्धाला
आज 22 वर्ष पूर्ण

भारतीय सैन्याचं शौर्याचं प्रतीक कारगिल युद्धाला आज 22 वर्ष पूर्ण झाली आहेत. राष्ट्रपती कोविंद आज द्रासमध्ये जाऊन शहिदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. कारगिल विजय दिवसाच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद द्रास इथे कारगिल युद्ध स्मारकावर श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यावेळी, CDS बिपिन रावत देखील उपस्थित राहतील.

चीनमधील नानजिंग शहरात
करोना रुग्णांची संख्या वाढतेय

चीनच्या वुहानमधून उगम पावलेल्या करोना व्हायरसने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. चीनमधील नानजिंग शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. सोमवारी ७६ नवे रुग्ण आढळल्यानंतर प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारीनंतर नोंद झालेली सर्वाधिक संख्या आहे. आरोग्य विभागाने या भागात चाचण्या करण्यावर भर दिला आहे.

तलवारबाजीत भवानी देवीने
रचला इतिहास

तमिळनाडूच्या सीए भवानी देवीने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करताना इतिहास रचला आहे. तलवारबाजीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या एकमेव खेळाडूने एकेरी महिला गटात विजयी सुरुवात केली आहे. भवानी देवीने ट्युनिशियाच्या नादिया बेन अजिजीचा १५-३ ने पराभव केला. भवानी देवीने फक्त सहा मिनिटे १४ सेकंदांमध्ये सामना जिंकत प्रथमच ऑलिम्पिकमध्ये तलवारबाजीत यश मिळवून दिले आहे. तलवारबाजी या खेळात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली होती.

तर मिराबाई चानूला सुवर्णपदक
मिळण्याची शक्यता

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या मिराबाई चानूला सुवर्णपदक मिळण्याची शक्यता आहे. वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी चीनची खेळाडू झीयू हौ हिची डोपिंग टेस्ट होणार असल्याचं वृत्त आल्यानंतर चर्चा रंगली आहे. जर झीयू हौ डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आली तर दुसऱ्या क्रमांकावर विजेती राहिलेल्या मिराबाई चानूचं मेडल अपडेट केलं जाईल आणि सुवर्णपदक दिलं जाईल. असं झालं तर मिराबाई चानूसाठी हा ऐतिहासिक क्षण असेल. यासोबतच वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मिराबाई चानू पहिली भारतीय खेळाडू ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात महिलेला
आमदाराकडून दमदाटी

मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटी केल्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरामधून टीका होताना दिसत आहे. आता भाजपा नेते नितेश राणे यांनी टीका केलीय. नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये याच व्यक्तीमुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन झालं आहे ते आता कोणत्या नैतिकतेमध्ये बसते?, असा प्रश्न उपस्थित केलाय.

चौकशी सुरू असताना
राज कुंद्रावर शिल्पा भडकली

अश्लील सिनेमांच्या निर्मितीसंदर्भात मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरी जाऊन चौकशी केलीय. या चौकशी दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि शिल्पाचा पती राज कुंद्रादेखील तिथे उपस्थित होता. यावेळी पोलीस चौकशी दरम्यानच राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्यात तू तू मै मै झाल्याचं वृत्त समोर येतंय. यावेळी शिल्पा शेट्टी राज कुंद्रावर चांगलीच भडकली होती. चौकशी दरम्यान तिला अश्रू आवरणं कठिण झालं.

पंडित नेहरूंच्या शांतीदूत धोरणामुळे
देशाचं नुकसान : राज्यपाल

पंडित जवाहरलाल नेहरुंना शांतीदूत बनावं असं वाटत असल्याने देश कमकुवत झाला आहे आणि खूप वेळापर्यंत हे सुरुचं होतं असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित ‘अशक्य ते शक्य’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या पत्नी आणि इतर जण उपस्थित होते.

अनु मलिकच्या आईचे निधन

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय म्यूझिक कंपोझर आणि ‘इंडियन आयडल १२’चा परीक्षक अनु मलिकच्या आईचे २५ जुलै रोजी निधन झाले. काल दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेक सेलिब्रिटी सोशल मीडिया पोस्टद्वारे अनु मलिकच्या आईला श्रद्धांजली वाहत आहेत.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.