शेतकरी कुटुंबाचा मंत्रालयासमोर
आत्महत्या करण्याचा प्रयत्न
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील माळवटा गावातील राजू चन्नापा हुनगुंडे याने आपल्या कुटुंबासह अंगावर रॉकेल ओतून घेत मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नांदेड जिल्हयातील पालम रोड धानोरा काळे येथील जवळपास साडे आठ किलोमीटरच्या रस्त्याचे काम करण्यात आले. ज्याची किमंत 1 कोटी 70 लाख रुपये आहे. त्यापैकी केवळ 14 लाख रुपये देण्यात आले आहेत. उर्वरित रक्कम मागितले म्हणून मला आणि माझ्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली असा आरोप हुनगुंडे यांनी केला आहे. याबाबत मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली.
उत्कर्ष सोहळ्यात मुलीचे स्वप्न
ऐकून पंतप्रधान झाले भावुक
गुजरातच्या या उत्कर्ष सोहळ्यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल उपस्थित होते. गुजरात सरकारने राज्यात चार प्रमुख योजना राबविल्या. त्याची 100 टक्के अंमलबजावणी केली. या योजनांमुळे गरीब गरजूंना आर्थिक मदत होणार आहे.याच कार्यक्रमात सरकारी योजनांचा लाभ घेतलेले एक लाभार्थी अयुब पटेल यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करत होते. यावेळी अयुब पटेल यांनी आपल्या मुलीचे स्वप्न काय आहे ते मोदी यांना सांगितले. हे स्वप्न ऐकून मोदी भावुक झाले.
राज्यसभेच्या ५७ जागांची
निवडणूक जाहीर
राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या ५७ जागांची निवडणूक जाहीर झालीय. भारतीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचं सविस्तर वेळापत्रक जारी केलं आहे. यानुसार १० जून २०२२ रोजी या ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांचा समावेश आहे. यात शिवसेना नेते संजय राऊत यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांच्यापर्यंतच्या नेत्यांचा समावेश आहे.
निवडणूक होत असलेल्या ५७ राज्यसभा खासदारांची मुदत २१ जून ते १ ऑगस्ट या काळात संपत आहे. यात १५ राज्यांमधील खासदारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ६ खासदारांची मुदत ४ जुलै २०२२ रोजी संपत आहे
स्वराज्य संघटनेची संभाजीराजे
छत्रपती यांच्याकडून घोषणा
गेली अनेक वर्ष मी समाजाला संघटित करण्यासाठी राज्यभरात दौरे केले. यावेळी समाजाला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांना मानणाऱ्या समाजातील सर्व जातीपातीच्या लोकांना संघटित करून त्यांना एकाच छत्राखाली आणण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करत असल्याची घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे. स्वराज्यच्या माध्यमातून सगळ्यांना संघटित करून त्यांना दिशा देण्यासाठी आणि गोर गरिबांच्या कल्याणासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ताजमहालचे वीस दरवाजे उघडण्याची
याचिका न्यायालयाने फेटाळली
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने ताजमहालचे 20 बंद दरवाजे उघडण्याची विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनावणी केली. न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपीठाने आज दुपारी 2.15 वाजता या प्रकरणावर सुनावणी करताना याचिका फेटाळून लावली. अयोध्येतील डॉ.रजनीश सिंह यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेत इतिहासकार पीएन ओक यांच्या ताजमहाल या पुस्तकाचा हवाला देऊन दावा केला आहे की ताजमहाल हे वास्तवात जो महालय आहे, जे राजा परमर्दी देव यांनी 1212 मध्ये बांधले होते.
आमचं चुकलं तर लोक
अक्कल शिकवतात : शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी भारतात आम्हा राजकारणी लोकांपेक्षा सामान्य माणूस शहाणा आहे, असं मत व्यक्त केलं. तसेच लोक आमचं चुकलं तर अक्कल शिकवतात, असंही नमूद केलं. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळाचं उदाहरणही दिलं. शरद पवार म्हणाले, “भारताची जमेची बाजू म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना. आपण स्वतंत्र झाल्यानंतर १९५० मध्ये आपल्याकडे घटना आली. या घटनेने देशाला एकसंघ ठेवलं ही गोष्ट मान्यच करावी लागेल.
गुगलवर संस्कृत भोजपुरीमध्ये
भाषांतर करता येणार
गुगलनं भाषांतर करण्यासंदर्भात एक मोठे अपडेट जारी केले आहे. आता तुम्ही गुगलवर संस्कृत आणि भोजपुरीमध्ये भाषांतर करू शकता. नवीन अपडेटनंतर गुगल ट्रान्सलेटमध्ये संस्कृत आणि भोजपुरीसह आठ नवीन भाषा जोडल्या गेल्या आहेत. नवीन अपडेटनंतर गुगलमध्ये तुम्हाला संस्कृत, आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मणिपुरीमध्ये भाषांतर करता येईल. गुगल ट्रान्सलेटवर उपलब्ध असलेल्या एकूण भारतीय भाषांची संख्या आता १९ वर गेली आहे. तर जगभरातील एकूण १३३ भाषांमध्ये आता भाषांतर करता येणार आहे.
पुण्यात किडनी तस्करीप्रकरणी
डॉक्टर सह सहा जणांविरुद्ध गुन्हा
पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे ट्रस्टी डॉ. परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील सहा डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिलाही बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचं आढळून आल्याने तिच्यावरही पोलीसांनी गुन्हा नोंद केलाय. एकूण 15 जणांच्या विरोधात पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवलाय. रूबी हॉल क्लिनिकमध्ये काही दिवसांपूर्वी किडनी तस्करीचा प्रकार उघडकीस आला होता. सारिका सुतार या महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
इवल्याशा हातांनी उडवलं भलंमोठं प्लेन, अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकल्याने घेतली आकाशात झेप
वय वर्षे फक्त 7 वर्षे… जे वय सामान्यपणे कागदी विमानं उडवण्याचं, खेळण्यातील विमानांशी खेळण्याचं असतं. पण या वयात एका चिमुकल्याने खरंखुरं विमान उडवलं आहे. आपल्या इवल्याशा हातात विमानाचा ताबा घेऊन त्याने आकाशात उंच झेप घेतली. या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एवढ्याशा चिमुकल्याची इतकी मोठी भरारी पाहून सर्वजण थक्क झाले आहेत.विमान उडवणं वाटतं तितकं सोपं नाही. अगदी आपण सुरुवातीला सायकल शिकतो तेव्हाच किती तरी वेळा पडतो. असं असताना हा 7 वर्षांचा मुलगा मात्र विमान उडवतो आहे. जे नक्कीच वाटतं तितकं सोपं नाही. यासाठी रितसर प्रशिक्षण घ्यावं लागतं. पण हा मुलगा अगदी प्रोफेशनल पायलट असावा अगदी तसं प्लेन उडवताना दिसतो.
औरंगाबादमध्ये गोंधळ! अकबरुद्दीन औवेसींच्या भेटीसाठी कार्यकर्ते आक्रमक, पोलीस-मुस्लिम तरुण आमनेसामने
एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. अकबरुद्दीन औवेसी हे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या भेटीसाठी मुस्लिम समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. औवेसी यांच्या आराम कक्षाबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमा झालेली होती. पण प्रत्येक कार्यकर्त्याला अकबरुद्दीन यांना भेटता येणं शक्य नाही. त्यामुळे पोलीस आणि काही कार्यकर्त्यांनी त्यांना रोखलं. त्यामुळे पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यावेळी बराच वेळ गोंधळ झाला. प्रवेश न दिल्यामुळे शेकडो कार्यकर्ते आक्रमक झाले. औरंगाबाद येथील सुभेदारी विश्राम गृह याठिकाणी अकबरुद्दीन ओवेसी आल्यानंतर संबंधित प्रकार घडला.
जळगावात राडा, पतसंस्थेच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत दोघांची बंडखोरी, मोठा गदारोळ
आशिया खंडातील सर्वाधिक नावलौकिक असणारी जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची पतसंस्थेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या पतसंस्थेच्या चेअरमनपदाची निवड आज होत असताना सहकार गटाने लोकसहकारच्या गटाच्या दोन सदस्यांना पळवून लावण्याने मोठा गोंधळ उडाला. या गोंधळामुळे परिसरात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण पोलिसांच्या मध्यस्तीने संबंधित प्रकरण निवळलं.
राज्यात 281 गावांची पाण्यासाठी वणवण, कोकणात सर्वात जास्त पाणी टंचाई
राज्यातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांबाबतही मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी राज्याच्या पिण्याच्या पाण्याबाबत आढावा घेण्यात आला. राज्यातील मोठे, मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याची माहिती देण्यात आली. यंदा राज्यातील सर्व प्रकल्पांमधील पाणीसाठा 41.19 टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत हा पाणीसाठा 39.92 टक्के इतके होता. राज्यातील 281 गावे, 738 वाड्यांना 270 टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
जडेजाचाही रैना होईल! CSK मधील घडामोडींवर माजी क्रिकेटपटूचा गंभीर दावा
चार वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा सिझन निराशाजनक ठरला. महेंद्रसिंह धोनीच्या जागी रविंद्र जडेजाला कॅप्टन करण्याचा सीएसकेचा प्रयोग फसला. आठ सामन्यानंतर धोनीला पुन्हा एकदा टीमची जबाबदारी घ्यावी लागली. 11 पैकी फक्त 4 सामने जिंकणारी सीएसकेची टीम पॉईंट टेबलमध्ये सध्या नवव्या क्रमांकावर असून स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. मैदानातील खराब कामगिरीनंतर मैदानाच्या बाहेरही सीएसकेमध्ये सर्व आलबेल नाही, असं मानलं जात आहे. रविंद्र जडेजा आणि टीम मॅनेजमेंट यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं वृत्त आहे. सीएसकेने इन्स्टाग्रामवर रवींद्र जडेजाला अनफॉलो केल्याचा दावा केला जात आहे. जडेजाचं सीएसकेसाठीचं योगदान बघता त्याला अशी वागणूक दिली जात असल्याबद्दल अनेकांनी नाराजी बोलून दाखवली. त्यातच जडेजानं दुखापतीमुळे उर्वरित आयपीएल सिझनमधून माघार घेतली आहे.
SD social media
98 50 60 35 90