प्रहारचे बच्चू कडू, शंभुराज देसाई ते अनेक दिग्गाजांची शिंदेंना साथ, बंडखोरांचा पहिला फोटो समोर

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा पहिला फोटो आता समोर आला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे यांच्यासोबत 30 पेक्षा जास्त आमदार असल्याची बातमी समोर येत होती. विशेष म्हणजे शिंदे यांच्यासोबत नेमके कोणकोणते आमदार आहेत याची थेट माहिती देणारा फोटोच आता समोर आला आहे. हा फोटो ‘न्यूज 18 लोकमत’च्या हाती लागला आहे. विशेष म्हणजे प्रहार संघटनेचे आमदार स्वत: बच्चू कडू हे देखील या आमदारांसोबत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

समोर आलेल्या फोटोनुसार, एकनाथ शिंदे यांना जवळपास 33 आमदारांचा पाठिंबा आहे. यामध्ये प्रहार संघटनेचे बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांचादेखील समावेश आहे. त्यापाठोपाठ आमदार महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेंद्र दळवी, अनिल बाबर, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभुराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपमान भुमरे, अब्दुल सत्तार, नितीन देशमुख, प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहास कांदे, संजय शिरसाठ, प्रदीप जयस्वाल, संजयकुमार रायमुलकर, संजय गायकवाड, एकनाथ शिंदे, विश्ननाथ भोईर, शांताराम मोरे, श्रीनिवास वणगा, प्रताप सरनाईक, प्रकाश आबिटकर, चिमणराव पाटील, नरेंद्र बोंडेकर, लता सोनवणे, यामिनी जाधव आणि बालाजी किणीकर यांचा शिंदेंना पाठिंबा आहे. या आमदारांच्या साथीने शिंदे भाजपसोबत हातमिळवणी करु शकतात किंवा स्वतंत्र पक्षाची देखील स्थापना करु शकतात.

विशेष म्हणजे एक आणखी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतच्या हॉटेलमध्ये 37 आमदार सोबत होते. शिंदेंची त्यांच्यासोबत बैठक झाली. एकनाथ शिंदे यांना कायदेशीर सल्ला देणारी तज्ज्ञ कमिटीदेखील तिथे पोहोचली. यामध्ये तीन तज्ज्ञ वकील आहेत. या बैठकीत पुढची रणनीती ठरली. एकनाथ शिंदे राजीनामा देणार की स्वतंत्र पक्ष काढणार याबाबतचा निर्णय घेण्यासाठी सुरतच्या हॉटेलमध्ये चर्चा झाली. विशेष म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपची पडद्यामागची भूमिका राहिलेली आहे. भाजपच्या एकही नेत्याचं याबाबत वक्तव्य आलेलं नाही. भाजपची सध्याची भूमिका वेट अॕण्ड वॉचची आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.