94 वर्षांचं वय म्हणजे खरं तर काहीही न करता नुसतं बसून आपल्याला हवं ते करून घेण्याचं वय. अनेकांना या वयात साधं चालायलाही जमत नाही; पण हरियाणाच्या 94 व्या वर्षांच्या एका आजींनी अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे सध्या देशात सगळ्यांच्या तोंडी या आजींचं नाव आहे. या आजींचं नाव आहे भगवानी देवी. भगवानी देवी यांनी वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये एक गोल्ड आणि दोन ब्राँझ मेडल्स जिंकली आहेत. जगभरात भारताचं नाव उंचावल्यावर भगवानी देवी भारतात परतल्यावर अर्थातच त्यांचं जल्लोषात स्वागत झालं. याबद्दलचं वृत्त ‘लाइव्ह हिंदुस्तान’ने दिलं आहे.
भगवानी देवी दिल्ली एअरपोर्टवर आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांसह भरपूर गर्दी जमली होती. त्या वेळी भगवानी देवी यांनीही डान्स केला आणि आपल्या विजयाचा जल्लोष केला. फिनलँडमध्ये वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चँपियनशिप आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भगवानी देवी यांनी भारतासाठी तीन पदकं जिंकली. अन्य देशात पदक जिंकून आपल्या देशाचं नाव उज्ज्वल केल्याचा मला खूप आनंद आहे अशी प्रतिक्रिया भारतात परतल्यानंतर भगवानी देवी यांनी व्यक्त केली. ANI या वृत्तसंस्थेनं भगवानी देवींचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये भगवानी देवी आनंदाने डान्स करताना दिसत आहेत.
भगवानी देवी यांनी 100 मीटर स्प्रिंट इव्हेंटमध्ये फक्त 24.74 सेकंदांमध्येच गोल्ड मेडल जिंकलं. त्याशिवाय गोळाफेक म्हणजेच शॉटपुटमध्ये ब्राँझ मेडल जिंकलं. यापूर्वी चेन्नईत आयोजित केलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्येही भगवानी देवी यांनी तीन सुवर्णपदकं जिंकली होती. त्यानंतर त्यांची 2022 च्या वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चँपियनशिपसाठी त्यांची निवड झाली होती.
भगवानी देवींच्या या यशाबद्दल देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांना ‘क्वीन ऑफ अॅथलेटिक्स’ असं म्हटलं जात आहे. क्रीडा मंत्रालयानंही भगवानी देवींच्या या शानदार कामगिरीबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच अनुराग ठाकूर, हरदीपसिंग पुरी आणि पीयूष गोयल यांच्यासह अन्य नेत्यांनीही त्यांचं अभिनंदन केलं केलं आहे.वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चँपियनशिप ही स्पर्धा जगभरातल्या 35 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अॅथलीट्ससाठी आयोजित करण्यात येते. 1975 साली या स्पर्धेची सुरुवात झाली. यंदा ही स्पर्धा 29 जून ते 10 जुलैदरम्यान फिनलँडमध्ये आयोजित करण्यात आली होती. भगवानी देवींनी यात घवघवीत यश मिळवलं.