नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा झोडपले

ऐन थंडीच्या दिवसांत मुंबईत पावसांच्या हलक्या सरी बरसल्याने वातावरणातील गारवा आणखी वाढला आहे. हवामान बदलामुळे अचानक पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांनाही छत्री बाहेर काढावी की स्वेटर हे कळेना झालंय. मुंबईत पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं (Weather Forecast) आधीच वर्तवला होता. त्याप्रमाणे मुंबई, ठाणे पालघरसह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगावच्या काही भागाला पावसाने पुन्हा झोडपले आहे. तसेच गुजरात आणि लगतच्या मध्यप्रदेशातील काही भागातही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी ढगाळ आकाशासह हलका पाऊस पडला आहे, तर उत्तर महाराष्ट्रात मात्र मुसळधार पाऊस पडला आहे. तसेच येत्या काही तासातही काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मिरचीच्या पिकाला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात मिरचीचे उत्पन्न होते. व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी आपली मिरची सुकवण्यासाठी मोकळ्या मैदानात टाकली होती. मात्र अचानक पाऊस आल्याने मिरची भिजली तसेच मजुरांची देखील तारांबळ उडाली. दुसरीकडे रब्बी हंगामातील पिकांना देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. गहू आणि ज्वारीचे पिक भुइसपाट झाले असून, ढगाळ हवामानामुळे हरभाऱ्यावर देखील अळीचा प्रादुर्भाव होण्याचा दाट शक्यता आहे. ऐन हातातोंडाळी आलेल्या हात हिरावल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.

ढगाळ वातावरण असल्याने थंडी काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र आज कोसळलेल्या सरींमुळे हवेत गारवा निर्माण झाला असून, गारठा वाढला आहे. किमान तापमानात देखील घट नोंदवण्यात आली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बळी राजा संकटात सापडला आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. आधी कोरोनाचे संकट असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना आणि अवकाळी अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. त्यातच गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळेही शतकरी आधीच कर्जबाजारी झाला आहे. त्यातच आता अवकाळीने हातातोंडाला आलेली पिकं जाण्याची भिती शेतकऱ्यांच्या मनात तयार झाली आहे. त्यामुळे शासनाकडून काहीतरी दिलासा मिळावा अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.