देशातील बहुचर्चित मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या प्रकल्पावर लवकरच दिल्लीत मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली. या बैठकीत बुलेट ट्रेनबाबत अंतिम निर्णय होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी जमीन अधिग्रहणाच्या कामालाही सुरुवात झाली आहे. समृद्धी महामार्गालगतची जास्तीत जास्त जमीन या प्रकल्पासाठी वापरली जाणार असून याव्यतिरिक्त 38 टक्के जमिनीचं नव्याने अधिग्रहण करणार असल्याची माहितीदेखील रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनच्या सदर प्रकल्पातील पुढील कामांकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती रावसाहेब दानवे यांनी दिली. 22 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत या प्रकल्पातील सर्व अडचणी सोडवून कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी 10 जिल्ह्यांतून मार्ग
नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार, देशात सात हाय-स्पीड रेल्वे कॉरिडोरसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. यातीलच मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशिम, अरावती, वर्धा आणि नागपूर अशा दहा जिल्ह्यांतून हा प्रकल्प जाणार आहे. बुलेट ट्रेनचा हा मार्ग समृद्धी महामार्गालगत असल्याने या प्रकल्पासाठी भूसंपादन कमी प्रमाणात होणार असल्याचा दावा केला जात आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी अमरावतीत उसळलेल्या दंगली या सरकारचं अपयश आहे, असा आरोप केला. सरकारने वेळीच सर्व घटनांची दखल घ्यायला पाहिजे होती, असंही त्यांनी म्हटलं.