अमित शहा लिहिणार छत्रपती शिवरायांवर पुस्तक, मुख्यमंत्री शिंदेंनी दिली बातमी
भाजपचे चाणक्य आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा आता अभ्यासकाच्या भूमिकेत पाहण्यास मिळणार आहे. अमित शहा यांच्याबद्दल कमी लोकांना माहिती आहे, आता अमित शाहंनी छत्रपतींचा इतिहास लेखन हाती घेताना लंडनमधील महाराजांचे शिवकालीन साहित्य पुन्हा देशात आणण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे. याचा विशेष आनंद आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.आज पुण्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते शिवसृष्टीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी बोलताना छत्रपतींच्या आशीर्वादामुळेच आम्हाला धनुष्यबाण मिळाला असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. अमित शाह यांच्या हस्ते या शिवसृष्टीचं लोकार्पण होतंय याचा मला विशेष आनंद आहे, कारण ते फक्त शिवभक्तच नाहीत तर अमित शाहंनी छञपतींचा इतिहास लेखन हाती घेताना लंडनमधील महाराजांचे शिवकालीन साहित्य पुन्हा देशात आणण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
शिंदे गटाच्या आमदाराला सुरक्षा पुरवण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या वाहनाचा औरंगाबादेत भीषण अपघात
औरंगाबादमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात पोलिसांची व्हॅन पलटी होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये चार पोलीस कर्मचाऱ्यांसह एक होमगार्ड जखमी झाला आहे. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. हे पोलीस शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना सुरक्षा पुरवण्यासाठी नेवरगावकडे निघाले होते मात्र वाटेतच त्यांची व्हॅन पलटी होऊन भीषण अपघात झाला. जनावर आडवे गेल्यानं हा अपघात झाला असल्याची माहिती मिळत आहे.
धनुष्यबाण हातातून जाताच, ठाकरे गटाचा खासदार आणि तानाजी सावंत दिसले एकत्र
शुक्रवारी निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. यावरून पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे. एकीकडे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र दुसरीकडे एक वेगळचं चित्र पहायला मिळाल्यानं अनेकांच्या भुवया उंचवल्या.
शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर व कैलास पाटील हे एकाच व्यासपीठावर आल्याचं पहायला मिळालं. यावेळी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांना जवळ बोलवून त्यांचा हात उंचावल्यानं राजकीय वर्तृळात चर्चाला सुरूवात झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच ही भेट राजकीय नसल्याची प्रतिक्रिया तानाजी सावंत यांनी दिली आहे.
शिवजयंतीनिमित्त मनसेने पुन्हा दाखवली ब्ल्यू प्रिंट, राज ठाकरेंच्या आवाजात विकासाचा Video
महाराष्ट्रासह देशभरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येत आहे. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याशिवाय आग्र्याच्या लाल महालात जिथून छत्रपती शिवाजी निसटले तिथेही यंदा पहिल्यांदाच शिवजयंतीचा कार्यक्रम होणार आहे.
शिवजयंतीनिमित्त मनसेने पुन्हा एकदा त्यांची ब्ल्यू प्रिंट दाखवली आहे. मनसेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून विकासाची ही ब्ल्यू प्रिंट शेअर केली आहे. ‘ज्या एका महान माणसाने आम्हाला आमची ओळख करून दिली आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्पण केलेला महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा’, असं सांगत मनसेने सत्तेत आल्यास महाराष्ट्राचा विकास कसा करणार याचा आराखडा दिला आहे.
ज्यु. एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं निधन
साऊथ सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर यांचा चुलत भाऊ आणि प्रसिद्ध साऊथ अभिनेता तारकरत्न यांचं निधन झालं आहे. शनिवारी रात्री त्यांनी बेंगलोरच्या एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक जाण्याने साऊथ इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.
आरआरआर फेम अभिनेता ज्युनिअर एनटीआर यांचा चुलत भाऊ अभिनेता तारक रत्न एका रॅलीदरम्यान अचानक बेशुद्ध झाले होते.त्यांना तात्काळ कुप्पम येथील एका रुणालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना बेंगलोरच्या नारायण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. आणि ते कोमात गेले होते. आणि काल त्यांचं निधन झालं. डॉक्टरांच्या मते त्यांना कार्डियाक अटॅक आला होता. ज्यामुळे त्यांचं निधन झालं आहे.
FD रेट्समध्ये वाढ सुरुच! ‘या’ बँकांनी वाढवले व्याजदर, 9.5 टक्के दराने मिळेल व्याज
8 फेब्रुवारी रोजी रिझर्व्ह बँकेने रेपो रेट्समध्ये 0.25 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. रेपो रेट्समध्ये वाढ केल्यानंतर कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँक ठेवींवरील व्याजदरही वाढू लागले आहेत. दरम्यान, खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँक, इंडसइंड बँक आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँकेने फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे.
IDFC फर्स्ट बँकेच्या सेविंग्स अकाउंटमध्ये आता जास्तीत जास्त 6.75 टक्के व्याज मिळेल. ही वाढ 15 फेब्रुवारी 2023 पासून लागू झाली आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक आता बचत खात्यातील 10 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर 4% व्याज देतेय. जर तुमच्या खात्यात 10 लाख ते 1 कोटी रुपये असतील तर तुम्हाला 6.25 टक्के दराने व्याज मिळेल. याशिवाय इंडसइंड बँकेचे FD ठेवीदार आता 2 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर 7.5% पर्यंत व्याज मिळवू शकतात.
विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25 हजार धावा, मोडला सचिनचा विश्वविक्रम
भारताचा क्रिकेटर विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक माईलस्टोन गाठला आहे. त्यानं सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडला. विराट कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने २५ हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमाची नोंद केली.
विराट कोहलीने दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात ८वी धाव घेताना विक्रम केला. ती धाव विराटच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतली २५ हजारावी धाव ठरली. विराटने ही कामगिरी ५४९ डावात केली आहे तर सचिनने २५ हजार धावांचा टप्पा ५७७ डावात ओलांडला होता.
WTC Final मध्ये भारताची एन्ट्री जवळपास निश्चित, ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं
भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत पहिले दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढवलं आहे. दिल्लीत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह ४ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली आहे. भारतासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. या मालिकेतील जय पराजयावर संघाच्या पॉइंट टेबलमधील स्थानावर फरक पडताना दिसत आहे.
सलग दोन पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाचा संघ पॉइंट टेबलमध्ये टॉपला आहे. तर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ आहे. पण दोन्ही संघांमधील पॉइंटचे अंतर कमी झाले आहे. भारताला आता थेट अंतिम फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी उर्वरित दोन्ही कसोटीपैकी एक सामना जिंकावा लागेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला दोन्ही सामन्यात पराभव पत्करावा लागला तर तो अंतिम फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीतून बाहेर पडू शकतात.
येशू ख्रिस्ताच्या १०० फूट उंच पुतळ्यावर पडली वीज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
सोशल मीडियावर अनेकदा अनेक प्रकारचे फोटो आणि व्हिडिओज व्हायरल होत असतात. नैसर्गिक आपत्ती असो किंवा इतर गोष्टी असोत अनेक व्हिडिओ व्हायरल होतात. मात्र आता एक व्हिडिओ समोर आला आहे तो व्हिडिओ ब्राझिलचा आहे. येशू ख्रिस्ताच्या १०० फुटी पुतळ्यावर वीज पडल्यचा हा व्हिडिओ आहे. ब्राझिलमधला हा येशू ख्रिस्ताचा पुतळा जगातला तिसरा सर्वात उंच पुतळा आहे. अशात या पुतळ्यावर वीज पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना शुक्रवारची आहे.ब्राझिलच्या रियो डी जनेरियोमध्ये येशू ख्रिस्तांचा भव्य पुतळा आहे. या पुतळ्यावर वीज पडतानाचा व्हिडिओ आणि त्यासंबंधीचे फोटो व्हायरल झाले आहेत. ही वीज येशू ख्रिस्ताच्या पुतळ्याच्या डोक्यावर पडली होती. हा व्हिडिओ आणि फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक लोकांचा काळजाचा ठोका चुकला होता. सोशल मीडियावर या फोटो आणि व्हिडिओचीच चर्चा सुरू होती.
२९६ तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन नागरिकांना बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढलं
टर्की आणि सीरियामध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. या घटनेत आतापर्यंत ४६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही देशामध्ये अद्याापही बचावकार्य सुरु आहे. मात्र या दरम्यान संपूर्ण जगाला अचंबित करणारी एक घटना घडली.बचाव पथकाने १३ दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन नागरिकांना जिवंत बाहेर काढलं आहे. हे तिघेही १३ दिवसांपासून अन्न पाण्याशिवाय ढिगाऱ्याखाली अडकले होते. एकाबाजूला या भूकंपामुळे हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर दुसऱ्या १३ दिवसांपासून अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढल्यानंतर याला निसर्गाचा चमत्कार असल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी बचाव पथकाने १२ दिवसांपासून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका ४५ वर्षीय नागरिकाला जिवंत बाहेर काढले होते.
पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाने जिंकले मन; चेतेश्वर पुजाराला दिली एक खास भेटवस्तू
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील दुसरा सामना पार पडला. दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने अजेय आघाडी घेतली आहे. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने चेतेश्ववर पुजारा एक खास भेटवस्तू दिली.
दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर चेतेश्वर पुजाराला पॅट कमिन्सने भारतासाठी कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण केल्याबद्दल ऑस्ट्रेलिने खेळाडूंनी स्वाक्षरी केलेली जर्सी दिली. आपल्या १००व्या कसोटीच्या पहिल्या डावात पुजारा शून्यावर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात पुजाराने संघासाठी विजयी धावा फटकावल्या.
SD Social Media
9850 60 3590