जरंडेश्वर कारखाना हे हिमनगाचं टोक आहे. त्यामुळे सर्वच 54 साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी मी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रं लिहून तशी मागणी करणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. त्यामुळे या 54 साखर कारखान्यांचे संचालक आणि कारखान्यांशी संबंधित राजकारणी अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. 54 साखर कारखान्यांची कवडीमोल भावात विक्री झाली आहे. त्यामुळे या कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे. जरंडेश्वर तर हिमनगाचं एक टोक आहे. या 54-55 कारखान्यांची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि इतरांनी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सर्वांची चौकशी झाली पाहिजे. त्यासाठी अमित शहा यांच्याकडे पत्रं लिहून मागणी करण्यात येणार आहे, असं पाटील यांनी सांगितलं. भाजपच्या काळात काही भ्रष्टाचार झाला असेल तर ही प्रकरणं काढायला कुणी अडवलं?, असा सवालही त्यांनी केला.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. मी पत्रं लिहू नये हे सांगणं सुद्धा एक प्रकारची हुकूमशाहीच आहे, अशी टीका त्यांनी केली.
शिवसेना नेते संजय राऊत दिल्लीत भाजप नेत्यांना भेटल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे ते नेहमी दिल्लीत जात असतात. ते तिकडे कुणाला भेटले त्याबद्दल माहीत नाही, असं सांगतानाच राऊत हे शिवसेनेचे एकमेव नेते आहेत. उद्धव ठाकरे यांचे ते एकमेव नेते आहेत. शिवसेनेकडे त्यांच्या व्यतिरिक्त बाकी नेते नाहीत, असा चिमटाही त्यांनी काढला.