२० वर्षांपासून दाऊद गँगशी
जान मोहम्मद शेखचे संबंध
दिल्ली पोलिसांनी मुंबईच्या धारावी परिसरामध्ये राहणाऱ्या जान मोहम्मद अली मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर त्यावरून मोठा गदारोळ राज्याच्या राजकीय वर्तुळात उडाला. विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करताना “एटीएस झोपली होती का?” असा सवाल केला असताना आता खुद्द एटीएस प्रमुखांनीच पत्रकार परिषद घेऊन त्याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी जान मोहम्मद शेखचे २० वर्षांपासून दाऊद गँगशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत एकूण ६ जणांना अटक केली असून त्यापैकी जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी परिसरात राहणारा होता. राज्यातील तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
अटक केलेल्या दहशतवाद्यांना
पाकिस्तानने प्रशिक्षण दिल्याचे उघड
भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आलेल्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील दोघांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने (आयएसआय) प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यासाठी, मॉड्यूलच्या वेगवेगळ्या संशयितांना आणि त्यांच्या नेटवर्कशी संबंधित लोकांना वेगवेगळी कामे दिली गेली होती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात
पाच जणांवर आरोप निश्चित
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात पुणे कोर्टाने पाच जणांवर आरोप निश्चित केले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. पाचही आरोपींनी यावेळी कोर्टात निर्दोष असल्याचं सांगितलं. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयापुढे ही सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी क्रमांक १, २, ३ आणि ५ असलेले डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळककर आणि विक्रम भावे विरुद्ध हत्येचा कट रचल्याचा गुन्हा निश्चित केला आहे. युएपीएच्या कलम १६ अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत. आरोपी क्रमांक ४ वकील संजीव पुनाळेकर यांच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला आहे.
अभिनेता सोनू सूदच्या कार्यालयाची
इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांकडून पाहणी
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईतील कार्यालयात इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहोचले आहेत. अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या कार्यालयाची पाहणी केली जात आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. सोनू सूदची नुकतीच दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॕम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून त्यानंतर काही दिवसांतच इन्कम टॅक्स विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
तालिबानचे सरकार स्थापन
होताच परस्परांमध्ये वादही सुरू
अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार स्थापन होताच परस्परांमध्ये वादही सुरू झाले आहेत. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अंतरिम सरकारची घोषणा केल्यानंतर काही दिवसांनी काबूलच्या प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये प्रमुख नेत्यांमध्ये मोठी वादावादी झाली. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानमधील दोन प्रतिस्पर्धी गटांच्या समर्थकांमध्ये प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये भांडण झाले. मात्र, तालिबानने अशा बातम्यांचे खंडन केले आहे.
संतपीठाचे शैक्षणिक
अभ्यासक्रम सुरू होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता. दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी पैठण येथील संतपीठाचं शैक्षणिक व्यवस्थापन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार, आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने यासंबंधीचा शासन निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे.
दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी
गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षी देखील दिल्लीत दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. गेल्यावर्षी दिवाळीत झालेलं वायू प्रदूषण पाहता यावर्षी आधीच केजरीवाल सरकराने फटाके बंदीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षी दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी केंद्राची
२६ हजार कोटी रुपयांची योजना मंजूर
वाहन क्षेत्राला मोठा दिलासा देताना केंद्राने सुमारे २६ हजार कोटी रुपयांची नवीन पीएलआय योजना मंजूर केली, ज्यामुळे देशातील इलेक्ट्रिक वाहने आणि हायड्रोजन इंधन वाहनांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल. सरकारचा अंदाज आहे की, मंजूर PLI योजनेमुळे वाहन क्षेत्रामध्ये ७ लाखांहून अधिक रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. ही घोषणा मागील वर्षी संपूर्ण वाहन उद्योगासाठी घोषित योजनेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली आहे, ज्यात वाहन उत्पादन आणि त्याच्या सहाय्यक युनिट्सचा समावेश आहे, ज्याची किंमत पाच वर्षांसाठी ५७ हजार ४३ कोटी रुपये आहे.
रविवार पासून सुरु होणाऱ्या आयपीएल
स्पर्धेसाठी प्रेक्षकांना प्रवेश मिळणार
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरु होत असून आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी आयपीएल आयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीएलसाठी मैदानामध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. १९ सप्टेंबर म्हणजेच रविवारी पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील तीनदा आयपीएल विजेता राहिलेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाशी सामना खेळणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा संघ मैदानात उतरणार असून हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे
आंदोलन म्हणजे नौटंकी : नाना पटोले
राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपा सध्या करत असलेलं आंदोलन ही नौटंकी आहे”, अशी बोचरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. “केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी न दिल्याने आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्याने फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील ओबीसींचं राजकीय आरक्षण धोक्यात आलं आहे. त्यामुळे, आंदोलनाची नौटंकी करून त्यांना आपलं हे पाप झाकता येणार नाही.
चीनमध्ये कोरोनाच्या
डेल्टा वेरिएंटचा कहर
संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गाच्या खाईत लोटणाऱ्या चीनमधील कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. चीनचा दक्षिण पूर्व प्रांत फुजियान मधील पुतियान या शहरात यामुळे चित्रपटगृह, जिम, हायवे बंद करण्यात आले आहेत. तर, शहरातील नागरिकांना शहर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या वाढल्यानं पुतियान शहरात हा निर्णय घेण्यात आला आहे.
जेईई मेन 2021 महाराष्ट्रातून
अथर्व तांबटची आघाडी
जेईई मेन 2021 सेशन्स 4 चा निकाल मंगळवारी रात्री उशिरा घोषीत करण्यात आलाय. यात रेकॉर्डब्रेक अशा 44 विद्यार्थ्यांनी 100 टक्के मार्क मिळवलेत. तर नंबर 1 रँकवर 18 जण आहेत. विशेष म्हणजे यावर्षी 7 लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी जेईईची परिक्षा दिलेली होती. ज्या 18 जणांनी रँक 1 मिळवलीय त्यात महाराष्ट्रातून अथर्व अभिजीत तांबट हा एकमेव मराठी विद्यार्थी आहे. आंध्राचे सर्वाधिक 4 तर त्यापाठोपाठ राजस्थानचे 3, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि तेलंगणाचे प्रत्येकी 2 विद्यार्थी टॉप 18 मध्ये आहेत. भाषिकदृष्ट्या तुलना केली तर सर्वाधिक 6 विद्यार्थी हे आंध्र-तेलंगणाचे आहेत. नंबर वन वर कर्नाटकचा गौरब दास आहे.
SD social media
9850 60 3590