JNU मध्ये मांसाहारी जेवणावरुन विद्यार्थी भिडले, हाणामारीत अनेक जखमी

आंदोलने आणि वादांसाठी सातत्याने चर्चेत असणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अभाविप तसेच डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटनांमध्ये रविवारी पुन्हा संघर्ष झाला. या संघर्षामध्ये काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. याबाबत दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. विद्यापीठाच्या कावेरी वसतीगृह खानावळीत रविवारी मांसाहारी जेवण तयार केले जात होते. त्याला मज्जाव करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे.

मात्र अन्य एका आरोपानुसार याच वसतीगृहात रामनवमीपूजेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत दोन्ही बाजूंकडील सहा विद्यार्थी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण सहा विद्यार्थी जखमी झाले असून या सर्व हाणामारीच्या घटनेचे एका व्हिडीओ व्हायरल झालाय.

जेएनयूमध्ये झालेल्या गोंधळासंदर्भात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते विनोद बन्सल यांनी वक्तव्य जारी केलेलं आहे. अतिरेक्यांच्या माध्यमातून अपप्राचार केला जातोय असं या वक्तव्यामध्ये म्हटलं आहे. प्रत्येकाला जेवणाचं स्वातंत्र्य आहे असं सांगताना वाद रामनवमी साजरी करण्यावरुन झाल्याचं ते म्हणाले आहेत. काही विद्यार्थी रामनवमीनिमित्त पूजा करत असतानाच डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं. त्यामुळे झटापट झाली असून मारहाण झालेली नसल्याचा दावा बन्सल यांनी केलाय.

अभविपच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या दाव्यानुसार रामनवमीच्या पूजेचं आयोजन केलं असता त्या ठिकाणी डव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी येऊन आंदोलन केलं. याच रागामधून अभविप आणि डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला आणि मारहाण करण्यात आली. दोन्ही गटांमधील काही लोकांना किरकोळ मार लागलाय.

जेएनयूमध्ये अभविपच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला आहे. इतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मांसाहार बंदीला विरोध केल्याने हा गोंधळ झाला असून ६० ते ७० जण जखमी झालेत असं पीएचडीची विद्यार्थीनी असणारी आणि जेएनयूमधील विद्यार्थी संघटनेची माजी उपाध्यक्ष सारिका हिने म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.