टीडीपीचे संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची मुलगी उमा माहेश्वरी यांचा मृत्यू झाला आहे. उमा माहेश्वरी यांचं पार्थिव त्यांच्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेमध्ये मिळालं आहे. यानंतर पोलिसांनी उमा माहेश्वरी यांचं पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी स्थानिक सरकारी रुग्णालयात नेलं आहे. पोलिसांनी सीआरपीसी 174 नुसार गुन्हा दाखल केला आहे, याप्रकरणाची पुढचा तपास आता सुरू आहे.
उमा माहेश्वरी माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची चौथी मुलगी होती. मागच्या बऱ्याच काळापासून उमा यांना आरोग्याच्या समस्यांनी भेडसावलं होतं. जुबली हिल्स भागातल्या आपल्या राहत्या घरात उमा माहेश्वरी यांचं पार्थिव लटकलेल्या अवस्थेमध्ये मिळालं. पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला असला तरी सर्व बाजूंनी तपास करण्यात येत आहे. पोलीस अजूनही पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टची वाट बघत आहेत. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतरच तपासाची पुढची दिशा ठरवली जाईल.