नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ एनजीओ जन ऊर्जा मंचने आयोजित केलेल्या ‘उद्घोष’ कार्यक्रमात जागतिक किर्तीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, आर्चरी गर्ल (तिरंदाज) डॉली शिवानी, एनआयएमएसचे न्यूरोसर्जन डॉ. अनिरुद्ध पुरोहित यांना ‘नेताजी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हैदराबादमधील बिर्ला तारांगण येथे आज सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली.
इन्स्टिट्यूट ऑफ एन्शियंट इंडियन फिलॉसॉफीचे संस्थापक आणि जागतिक ख्यातीचे गणितज्ञ श्रीनिवास रामानुज यांचे नातू प्रा. राजम यांना हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि त्रिदंडी चिन्ना जेयार स्वामी यांच्या हस्ते ‘नेताजी’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. पी. व्ही. सिंधू हिला दिला जाणारा युवा रत्न पुरस्कार तिचे वडील रमणा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आयुष रत्न पुरस्कार आयुर्वेद तज्ज्ञ डॉ.सुरेश जकोटिया यांना दिला गेला. दिवंगत हरिप्रसाद भद्रूका यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र श्रीकृष्ण भद्रुका यांनी स्वीकारला.
डॉली शिवानी या तिरंदाज असलेल्या 9 वर्षीय खेळाडूला बालरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. ती 3 वर्षांची असताना तिला तिच्या वडिलांनी तिरंदाजीचे प्रशिक्षण दिले होते. श्याम गोपाल दास यांना गिलोई आणि तुळशीच्या औषधी वनस्पतींचे मोफत वाटप केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. तिरंदाजी दांपत्य सत्यनारायण चेरुकुरी आणि कृष्णा कुमारी यांना संस्कृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. Cerebral Palsy (सेरेब्रल पाल्सी) वर काम करणाऱ्या एनआयएमएस हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. अनिरुद्ध पुरोहित यांचादेखील गौरव करण्यात आला.
116 लोकांना आत्महत्या करण्यापासून रोखल्याबद्दल टांक बुंद हनुमंतू म्हणून ओळखल्या जाणार्या वड्डे हनुमंतू यांना समाज सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वतःच्या 250 एकर जमिनीवर औषधी वनस्पतींची लागवड करणाऱ्या तेलंगणाच्या जी. व्ही. के. राव यांचा गौरव करण्यात आला.