‘निवडणूक आयोगाचा निकाल स्वीकारून…’, शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना भविष्यासाठी सल्ला

शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल म्हणजे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. निवडणूक आयोगाच्या या निकालावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे, तसंच याविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिल्यानंतर वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या निकालावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे.

‘हा निवडणूक आयोगाचा निकाल आहे, एकदा निकाल लागल्यावर त्यावर चर्चा करता येत नाही. तो स्वीकारायचा आणि नवीन चिन्ह घ्यायचं. त्याचा काही फार परिणाम होत नसतो. काँग्रेसमध्ये एकदा इंदिरा गांधी असताना हा वाद झाला. काँग्रेसचं गाय-वासरू चिन्ह होतं, पण त्यांनी पंजा घेतला, पण त्यामुळे काही फरक पडला नाही. लोकांनी ते स्वीकारलं. आताही फरक पडणार नाही, कारी दिवस चर्चा होत राहील, नंतर लोक विसरून जातील,’ असं म्हणत शरद पवार यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय स्वीकारण्याचा सल्ला उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

उद्धव ठाकरेंसमोर नवी अडचण

दरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता नवी अडचण उभी राहिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची हा वाद सुरू असताना ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल हे चिन्ह दिलं होतं. पण आता केंद्र सरकारचं गुलाम निवडणूक आयोग हे चिन्हही काढून घेईल, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्यानंतर समता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय मंडल यांनी एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केलं आहे. तसंच मशाल चिन्हाबाबतही त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. मशाल निवडणूक चिन्ह हे समता पार्टीचं आहे आणि या चिन्हासाठी समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात जाईल असं उदय मंडल यांनी म्हटलंय. उदय मंडल यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे एका बाजूला शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह गमावल्यानंतर दुसरीकडे मशाल हे नवं चिन्हही धोक्यात येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.