संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकार आणि विरोधकांमधला गतिरोध संपल्यानंतर सोमवारी दुपारी महागाईच्या मुद्द्यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान तृणमूल काँग्रेसच्या महिला खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी लोकसभेत कच्चं वांग दाखवलं, नंतर त्यांनी हेच वांगं खाऊन महागाईचा निषेध नोंदवला. एलपीजी सिलेंडर एवढा महाग झाला आहे, की कच्च्या भाज्या खाण्यासाठी मजबूर व्हावं लागत आहे, असं काकोली घोष म्हणाल्या.
तृणमूल काँग्रेस खासदार काकोली घोष यांनी चर्चेदरम्यान एलपीजी सिलेंडरचे भाव कमी करण्याची मागणी केली आहे. मागच्या काही महिन्यांमध्ये सिलेंडरच्या किंमती चार वेळा वाढल्या आहेत. पहिले घरगुती गॅस 600 रुपये होता, आता यासाठी 1,100 रुपये मोजावे लागत आहेत. सरकारला आम्ही कच्च्या भाज्या खाव्या असं वाटतं का? सिलेंडरचे दर कमी केले गेले पाहिजेत, असं काकोली घोष लोकसभेत म्हणाल्या.
जुलै महिन्यामध्ये घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये 50 रुपयांची वाढ झाली होती. मागच्या एका वर्षातली ही गॅसच्या भावाची आठवी वाढ आहे. या भाववाढीनंतर गैर-सबसिडीचा एलपीजी दिल्लीमध्ये 1,053 रुपयांना मिळत आहे.