गेल्या काही महिन्यात नाशिक पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत तब्बल 7 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. त्यात ब्राऊन शुगर, चरस, गांजा, कुत्ता गोळी, गुटखा आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणी एकूण 171 आरोपींना तुरुंगाची हवा खायला पाठवले आहे.
सध्या आर्यन खान प्रकरणामुळे ड्रग्ज तस्करीची जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिक विभागात काही दिवसांपूर्वी ड्रग्ज तस्करीचे धागेदोरे थेट मालेगावमध्ये सापडले. हे प्रकरणही जिल्ह्यात बरेच गाजले. आता उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्राचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या दीड महिन्यात ड्रग्ज तस्करांवर धडाकेबाज कारवाई केल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी दिली. उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले की, गेल्या दीड महिन्यात उत्तर महाराष्ट्रात आठ ठिकाणी गांजाची शेती नष्ट केली. विशेषतः नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात चोरून गांजाची शेती करणे सुरू होते. त्यात नंदुरबारमध्ये तर वनविभागाच्या जागेवर कब्जा करून हे उद्योग सुरू होते. येणाऱ्या काळात नाशिक, धुळे, नगर, नंदुरबार, जळगाव पोलीस अधीक्षकांना गुन्हेगारी रोखण्यासाठी आवश्यक असेल ती कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक ग्रामीणमध्ये रेशनच्या धान्याचा चोरटा व्यापार सुरू होता. त्यात साडेसहा लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. जळगावमधील धरणगावात असाच प्रकार सुरू होता. तिथे जवळपास पावणेतेरा लाखांचा गहू, तांदूळ जप्त केला. विविध ठिकाणच्या कारवाईत 5117 किलो गांजा जप्त करण्यात आला. सोबतच अर्धा किलो ब्राऊन शुगर, 481 ग्रॅम चरस, चार गाड्या, मोटारसायकल, मोबाईल असा एकूण साडेचार कोटींचा मुद्देमाल जप्त केला. एकूण 31 प्रकरणांत कारवाई केली. त्यात 45 आरोपींना बेड्या ठोकल्या. अवैध गुटखा प्रकरणांत 37 कारवाया केल्यात. त्यात 64 आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यात 2 कोटी 27 लाख 37 हजार 302 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती शेखर यांनी दिली.
तरुणांना शस्त्रे पुरवून गुन्हेगारी विश्वात ढकलणाऱ्या सतनामसिंग या आरोपीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारवाईत 40 गावठी पिस्तुल, 84 काडतुसे, 2 मॅक्झिन, 65 तलवार, 8 कोयते, 1 गुप्ती, सत्तुर, चॉपर, चाकू आदी हत्यारे जप्त केलीयत. त्यात 60 गुन्ह्यांमध्ये 62 आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती शेखर यांनी दिली. यावेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जळगावचे प्रवीण मुंढे, अहमदनगरचे मनोज पाटील आदी उपस्थित होते.