पब्जी या गेमने आणखी एक बळी घेतला आहे. पब्जीच्या नादात विरामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दीपक दौडे वय 23 असे या तरुणाचे नाव आहे. दिपकला गेल्या दोन वर्षांपासून पब्जीचे व्यसन जडले होते. तो दिवस-रात्र पब्जी खेळायचा. सतत गेम खेळल्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यातच त्याने झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्याने त्याचा मृत्यू झाला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दीपकला गेल्या दोन वर्षांपासून पब्जी हा गेम खेळण्याचे व्यसन जडले होते. तो रात्रंदिवस गेम खेळत असल्यामुळे त्याला निद्रानाशाचा त्रास सुरू झाला. यातूनच त्याचे मानसिक संतुलन बिघडले. त्याच्यावर गोरेगावमधील गोकुळधाम सेंटरमध्ये उपचार सुरू होते. झोप येत नसल्याने डॉक्टरांनी त्याला झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या. मात्र त्याने झोपच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्याने त्याची तब्येत बिघडी. त्याला कांदिवलीमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. कांदिवली पोलिसांकडून संबंधित प्रकरणाचे कागदपत्र मिळाल्यानंतर विरार पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पब्जी या गेमने जगभरात धुमाकूळ घातला आहे. बालकांसह अनेक तरुण देखील या गेमच्या आहारी गेले आहेत. अनेकांना या गेमचे व्यसन जडले असून, ते रात्रंदिवस हा गेम खेळताना दिसतात. या गेममुळे आतापर्यंत अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू जरी वेगवेगळ्या कारणांमुळे झाले असले तरी त्याच्या मुळाशी पब्जी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कुठलाही गेम असो, त्याचा अतिरेक न करता, ठराविक मर्यादेपर्यंतच तो खेळावा, अन्यथा त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.