काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. राहुल गांधी यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. याआधी भिंवडी येथील प्रचार सभेत राहुल गांधींनी आरएसएसबद्दल वक्तव्य केलं होतं, त्यानंतर त्यांच्याविरुद्ध भिंवडीमध्येही गुन्हा दाखल झाला होता.
राहुल गांधींच्या वक्तव्याचे पडसाद
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे, त्यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वक्तव्य केलं. या वक्तव्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली. भाजप, मनसे आणि शिंदे गटाने राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी आपण राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसरीकडे मनसेही राहुल गांधींविरोधात आक्रमक झाली आहे. भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची सभा शेगावला होणार आहे, त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना शेगावला जाण्याचे आदेश दिले आहेत.