मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारातील एन विंग मध्ये गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत लाखो रुपयांची वित्तहानी झाली आहे. पुठ्ठे ,बॉक्स इत्यादी वस्तूंनी पेट घेतल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. जवळजवळ १५ ते २० गाळे आगीच्या भक्षस्थानी सापडले. आग लागताच गाळ्यांमधील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे दोन कामगारांनी पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने पायाला दुखापत होऊन जखमी झाले असून त्यांना महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलानी तब्बल २ ते अडीच तास अथक प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यास यश प्राप्त झाले आहे. परंतु या आगीच्या घटनेने पुन्हा एकदा एपीएमसी बाजार समितीतील अनधिकृत वापर आणि अग्नि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ बाजारात सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास अचानक एन एन विंग मध्ये आग लागली. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पुठ्ठे, बॉक्स, इत्यादी जळाऊ वस्तू होत्या. त्यामुळे बघता बघता क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी ४ वाजून ३६ मिनिटांनी अग्निशमन दल बाजारात दाखल झाले. वाशी आणि नेरुळ येथील अग्निशमन दलाच्या ६ ते ७ अग्निशमन बंब घटनास्थळी पोहचल्या. मोठ्या प्रमाणात जळाऊ खोके असल्याने आगीचे लोळ लांबपर्यंत पोचले . त्यामुळे आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागले आहेत. त्यामध्येच बघ्यांनी गर्दी केल्याने आग विझविण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे पोलिसांच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण मिळवून चारही बाजूने पाण्याचा फवारा केल्याने आग आटोक्यात आली. मात्र तबबल दोन ते अडीच तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. साधारणतः २५-३०गाळ्यांना आगीची झळ बसली आहे.