राज्यातील सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी होणार आहे. आजपासून कोर्टात नियमित सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काय कोर्ट काय निर्णय देतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलनटाईन डेच्या दिवशी ठाकरे-शिंदे यांच्या ब्रेकअपचा निर्णय होणार का? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना आणि शिंदे गट वादावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. हे प्रकरण सात सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणीसाठी सोपवायचं की नाही, यासंदर्भात यावेळी निर्णय होण्याची शक्यता आहे. या याचिकांवर नियमित सुनावणीची तारीख निश्चित झाल्यास सरकारची वैधता आणि आमदारांच्या अपात्रतेबाबत दोन-तीन महिन्यात निर्णय होऊ शकतो. शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला सहा महिन्यांचा कालावधी झाला असून पाच सदस्यीय पीठाने या याचिकांवर सुनावणी घेतली, तरच लवकर निर्णयाची अपेक्षा आहे.
या 16 आमदारांना नोटीस
महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना तुमच्यावर कारवाई का करू नये? याबाबत 48 तासात उत्तर द्यायची नोटीस पाठवली होती. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले. संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोराने आणि चिमणराव पाटील या 16 आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली होती.
आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आला असल्यामुळे ते आम्हाला अशी नोटीस पाठवू शकत नाहीत, असा दावा शिंदे गटातल्या आमदारांनी केला, यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.