पालघर जिल्ह्यातील बाईसर तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये भीषण आग लागली आहे. एका केमिकल कंपनीला पहाटे आग लागली. कंपनीला लागलेल्या आगीमध्ये अनेक स्फोट झाल्याचे समोर आले आहे. अद्याप या दुर्घटनेत सुदैवाने कुणाच्याही मृत्यूची माहिती समोर आली नाही. घटनास्थऴी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
बाईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील प्रीमियर इंटरमीडियटस या केमिकल कंपनी आज पहाटे भीषण आग लागली. बघता बघता आगीने संपूर्ण कंपनी भक्षस्थानी सापडली. कंपनीला लागलेल्या आगीमध्ये एकापाठोपाठ भीषण स्फोट झाले.
अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, आगीने कंपनीने विळखा घातला. दूरपर्यंत धुराचे लोट दिसून येत होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समोर येऊ शकले नाही.
कंपनीला भीषण आग लागल्यानंतर काही वेळातच आगीने रौद्ररुपधारण केलं. बघता बघता शेजारी असलेल्या कंपन्यांनाही आगीने आपल्या भक्षस्थानी सापडल्या. आगीची तीव्रता इतकी भीषण आहे की, अग्निशमन दलाच्या गाड्यांना आग विझवण्यास अडचण येत आहे. धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे. या कंपनीला आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये अद्याप जीवितहानीचे वृत्त समोर आले नाही. अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.