कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ने नुकत्याच एका नव्या उत्पादनाचे लाँचिंग केले आहे. उत्तम प्रतीच्या टोण्ड दुधासोबत आता गोकुळच्या नव्या फ्लेवर्ड दुधाची चव आता ग्राहकांना चाखता येणार आहे. आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते तसेच गोकुळचे चेअरमन, संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत या नव्या उत्पादनाचा विक्री शुभारंभ कार्यक्रम झाला. त्यामुळे गोकुळचे हे नवे पेय ग्राहकांसाठी बाजारात दाखल होत आहे.
महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरांसह, गोवा राज्यात देखील गोकुळ संघाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरवले जातात. ग्राहकांकडून बऱ्याचदा गोकुळच्या फ्लेवर्ड मिल्कची मागणी होत होती. ग्राहकांच्या या मागणीचा विचार करुन गोकुळने फ्लेवर्ड दूध 200 मि.ली.च्या पॅकींगमध्ये उपलब्ध करून देण्याचा निर्णय नुकताच घेतला होता.
हे फ्लेवर्ड दूध तयार करताना वापरण्यात आलेले रंग आणि फ्लेवर हे उच्च दर्जाचे आहेत. त्याचबरोबर ते फुडग्रेड क्वॉलिटीचे असल्याने हे दूध ग्राहकांच्या पसंतीस नक्की उतरेल, असा विश्वास गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर गोकुळकडून येत्या काळात ताक आणि लस्सीचे टेट्रापॅक उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्या फ्लेवरमध्ये उपलब्ध?
सध्या गोकुळचे हे फ्लेवर्ड दूध स्ट्रॉबेरी, पिस्ता, व्हेनीला आणि चॉकलेट या चार फ्लेवर्समध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. ग्राहकांना हे फ्लेवर्ड दूध फक्त 30 रुपये किंमतीत 200 मि.ली.च्या पेटजार बॉटलमध्ये मिळणार आहे.
किती काळ टिकणार हे दूध ?
गोकुळचे हे फ्लेवर्ड दूध गोकुळच्याच उत्तम दर्जाच्या नैसर्गिक दुधापासून तयार करण्यात आलेले आहे. फ्लेवर्ड दूध डबल टोन्ड दुधापासून तयार केलेले आहे. तर त्यावर उच्च दर्जाची प्रकिया केल्यामुळे हे दूध सामान्य तापमानाला तब्बल सहा महिने टिकू शकते.