आज दि.२६ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी, वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आपल्या भारदस्त अभिनयानं तमाम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. काल त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं होतं. पण विक्रम गोखलेंची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. मागच्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. अनेक दशके सिनेसृष्टीत मोलाचं योगदान देणाऱ्या विक्रम गोखले त्यांच्या जाण्यानं सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.  विक्रम गोखले यांना मधुमेहाचा त्रास जाणवत होता. त्यांच्या पोटात पाणी झाल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

काल विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत आश्वासक सुधारण होत असल्याची बातमी समोर आली होती. पुण्याच्या दीनानाथ हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. विक्रम गोखले यांनी डोळे उघडले असून उद्या त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढलं जाऊ शकतं. त्यांचा रक्तदाब आणि हृदयाची क्रिया ही स्थिर आहे, असं जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगीकर यांनी सांगितलं होतं. आज पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

काहीजण 40 रेडे घेऊन तिकडे गेलेत, पण.. उद्धव ठाकरे यांचा थेट मुख्यमंत्र्यावर वार

काहीजण 40 रेडे घेऊन तिकडे गेलेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर टीका केली. जिल्ह्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.

टीम इंडियासाठी दुसऱ्या वन डेत करो या मरो

ऑकलंडमध्ये 300 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडूनही टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धची पहिली वन डे गमवावी लागली. त्यामुळे हॅमिल्टनच्या दुसऱ्या वन डेत टीम इंडियासमोर करो या मरोची परिस्थिती आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत यजमान संघानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. म्हणूनच उद्याची वन डे जिंकणं शिखर धवन अँड कंपनीसाठी गरजेचं आहे. त्यासाठी पहिल्या मॅचमध्ये खेळवण्यात आलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. खासकरुन महागड्या गोलंदाजांना विश्रांती देऊन नव्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे.

इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; एकाच वेळी 9 उपग्रहांचे प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज आणखी एक भीम पराक्रम केला आहे. इस्रोने एकाच वेळी 9 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. प्रक्षेपित करण्यात आलेल्या उपग्रहांमध्ये Oceansat-3 सह आठ छोट्या उपग्रहांचा समावेश आहे. यामध्ये एका भूतानच्या उपग्रहाचा देखील समावेश आहे. तामिळनाडूच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी 54/ ईओएस -06 मिशन अंतर्गत इस्रोकडून हे उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत. या वृत्ताला इस्रोकडून दुजोरा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रावरचं संकट दूर व्हावे , कामाख्या देवीकडे केली प्रार्थना

आज आम्ही सर्वांनी कामाख्या देवीचं मनोभावे दर्शन घेतलं. कामाख्या देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रावरचं संकट दूर व्हावे. राज्यातील जनतेला सुख, समृद्धी, चांगले, आरोग्य लाभू दे. शेतकरी, कष्टकरी अशा सर्वच घटकांना सुख, समाधान मिळावं, अशी प्रार्थना आम्ही कामाख्या देवीच्या चरणी केली आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बेळगावातील चार तरुणींचा किटवाड धबधब्यात बुडून मृत्यू

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यात बुडून बेळगाव शहरातील चार तरुणींचा मृत्यू झाला. किटवाड येथील तरुणांनी तत्परतेने बचाव कार्य केल्याने एका तरुणीला जीवदान मिळाले आहे. या घटनेमुळे किटवाड धबधब्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंदगड तालुक्यातील किटवाड येथे जलाशयाच्या शेजारी धबधबा आहे. तेथे महाराष्ट्रातील पर्यटकांचा ओढा असतो. तसेच बेळगाव पासून २० किलोमीटर अंतरावर असल्याने सीमाभागातील लोकही येथे नेहमीच हजेरी लावत असतात.

आता अमली दहशतवाद्यांनी शोधून काढला तस्करीचा नवा सागरीमार्ग

अमली दहशतवाद्यांच्या कारवाया म्हणजे दहशतवादाला बळकटीच हे लक्षात आल्यानंतर आता सर्वच गुप्तचर यंत्रणांचे लक्ष त्यांच्याकडे आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर या अमलीदहशतवाद्यांनी सागरी मार्गाचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यास सुरुवात केली. त्यानंतर गेल्या दीड वर्षांमध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीलगत सुमारे दीड हजार किलोग्रॅम वजनाचे आणि तब्बल सात हजार कोटी रुपये बाजारपेठीय किंमत असलेले अमली पदार्थ भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल, दहशतवादविरोधी पथक, सक्तवसुली संचालनालय यांनी एकत्र कारवाई करून ताब्यात घेतले. अफगाणिस्तानातील अमली पदार्थ आता सागरी मार्गाने भारतात आणण्याची दहशतवाद्यांची ‘मोडस ऑपरेंडी’ लक्षात आल्यानंतर भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने बारकाईने नजर ठेवत तस्करांच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर आता तस्करांनी भारतात प्रवेश करण्यासाठी नवा सागरी खुश्कीचा मार्ग शोधल्याचे भारतीय नौदलाच्या लक्षात आले आहे.

संगीत नाटक अकादमीचे पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील नऊ दिगज्जांचा सन्मान

संगीत नाटक अकादमीने गेल्या तीन वर्षांचे (२०१९, २०२० आणि २०२१) पुरस्कार शुक्रवारी जाहीर केले. त्यांत महाराष्ट्रातील नऊ मान्यवरांचा समावेश आहे. अकादमीने देशभरातील ७५ कलाकारांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानासाठी ‘संगीत नाटक अकादमी अमृत पुरस्कार’ही जाहीर केला आहे. वयाचा अमृत महोत्सव साजरा केलेल्या कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांत महाराष्ट्रातील  सहा कलाकारांचा समावेश आहे. 

अकादमीच्या पुरस्कारविजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील मालिनी राजुरकर (सहअध्यायी), आरती अंकलीकर-टिकेकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), प्रशांत दामले (अभिनय), उदय भवाळकर (हिंदूस्थानी शास्त्रीय गायन), शमा भाटे (नृत्य), पांडुरंग घोटकर (लोकसंगीत), माजिद गुलाबसाहेब सतारमेकर (वाद्यनिर्माण), नंदकिशोर कपोते (समग्र योगदान), मीना नायक (कळसूत्री बाहुल्या) यांचा समावेश आहे.

‘जीएसटी’ भरपाईचे १२,००० कोटीही राज्याला लवकरच – फडणवीस

केंद्र सरकारने ‘जीएसटी’च्या नुकसानभरपाईतील दोन हजार कोटी रुपये गुरुवारी राज्याला दिले असून, महालेखा परीक्षणानंतर (कॅग ऑडिट) उर्वरित १२-१३ हजार कोटीही लवकरात लवकर राज्याला मिळतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. पुढील वर्षांसाठी अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांची बैठक बोलावली होती. १ फेब्रवारी रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाआधी सल्लागार बैठका होत असून त्याअंतर्गत राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी सीतारामन यांनी चर्चा केली. या बैठकीत फडणवीस यांनी राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आर्थिक मुद्दे मांडले.

शेवटच्या क्षणी बाजी मारत ऑस्ट्रेलियाने भारताला चारली धूळ

पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला. या सामन्यात आकाशदीप सिंगची हॅट्ट्रिकही भारतीय पुरुष हॉकी संघासाठी व्यर्थ गेली. कारण पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून भारताचा शेवटच्या क्षणी ४-५ अशा फरकाने पराभव झाला. आकाशदीप सिंगने (१०, २७ आणि ५९ व्या मिनिटाला) तीन गोल केले तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने (३१व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरला गोलमध्ये रुपांतरित केले.ऑस्ट्रेलियाकडून लचलान शार्प (५व्या), नॅथन इफ्राम्स (२१व्या), टॉम क्रेग (४१ व्या) आणि ब्लेक गोव्हर्स (५७ आणि ६० व्या) यांनी गोल केले.सामना संपण्याच्या दोन मिनिटे अगोदर भारत ४-३ ने पिछाडीवर होता. आकाशदीपने ५९व्या मिनिटाला गोल करत सामना बरोबरीत आणला, मात्र यादरम्यान दोन पेनल्टी हरमनप्रीतच्या संघाला महागात पडल्या.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.