राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी शिवाजी राजाही ओबीसी होता असं आश्चर्यचकीत करणारं वक्तव्य केलंय. ते परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेडमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. त्याच व्यासपीठावर रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेही होते. मराठा, ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जानकरांनी हे वक्तव्य केलंय. जानकर एवढ्यावरच थांबले नाहीत तर, मराठे, मुसलमान, ओबीसी सगळ्यांना आरक्षण देतो असही म्हणाले. त्यासाठी त्यांनी आमदार निवडूण देण्याचं आवाहन केलं.
ओबीसी एल्गार कार्यक्रमात बोलत असताना महादेव जानकर म्हणाले, ‘आमचं होऊ द्या 30-35 आमदार, 10 मिनिटात ओबीसीची गंमत करुन टाकतो. मराठ्यांना पण आरक्षण देऊ शकतो अन् मुसलमानांनाही आरक्षण देतो. मुसलमानावर तर किती अन्याय आहे? गॅरज बघितलं का मुसलमान, आंब्याचं दुकान बघितलं का मुसलमान, कोंबडीचं दुकान बघितलं की मुसलमान, त्याचा कुठं कलेक्टर नाय, काय नाय, बोंबा बोंब, टोपी घालून केळं विकतंय, फळं विकतंय, अन् त्या मुसलमानाला लोक शिवा देतेत, हिंदू विरुद्ध मुसलमान, हिंदू बी भिकारी अन् मुसलमान बी भिकारी, अन राज्य चालवणारा तिसराच असतो. मराठा समाजाला माझा विनंतीय, शाहू महाराजांनी ह्या देशात आरक्षण दिलं. मराठ्यांना आरक्षण दिलं, पण नंतर आरक्षण का गेलं? शिवाजी राजा देखील ओबीसी होता. कुळवाडी भूषण राजा होता. आमच्यातल्या तथाकथित लोकांना वाटलं, आम्ही लय मोठं हाय गावचं, आम्हाला नको तसलं रिजर्वेशन. आणि आज अवस्था काय झालंय?’