एरवी शांत असणारे नाशिक गेल्या दोन महिन्यांपासून विविध गुन्हेविषयक घटनांनी पार ढवळून निघाले आहे. आता नाशिकमधल्या सातपूर परिसरात अशीच एक अत्याचाराची घटना उघड झाली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी आझाद शेखने एका महिलेला धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. संशयिताने पीडितेवर नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील एका लॉजिंग हॉटेलमध्ये 17 डिसेंबर रोजी रात्रभर बलात्कार केला. पीडितेने नकार दिल्यास तो तिच्या लहान मुलीच्या नरडीवर चाकू ठेवून ठार मारण्याची धमकी द्यायचा आणि बलात्कार करायचा, असा प्रकार समोर आला आहे.
आझाद शेखने महिलेवर सतरा डिसेंबर रोजी रात्रभर एका हॉटेलमध्ये बलात्कार केला. त्यानंतर त्याने त्या महिलेला आपल्या मित्राच्या घरी नेले. तिथेही त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. त्यानंतर तिला सोडून दिले आणि नाशिक सोडून पळून जायचा प्रयत्न केला. त्यासाठी तो रेल्वेस्टेशनवर गेला. तिथे बाहेरगावी जाण्यासाठी तिकीट काढले. याची कुणकुण सातपूर पोलिसांना लागली. त्यांनी तातडीने नाशिकरोड परिसरातील रेल्वेस्टेशन गाठले आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपीवर कलम कलम 376 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक श्याम जाधव यांनी पुढील तपास सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मग ते बनावट नोटाप्रकरण असो की, एकाच आठवड्यात झालेले तीन खून असो की जिल्ह्यात गेल्याच महिन्यात पडलेले तीन दरोडे. यामुळे नाशिकच्या शांत प्रतिमेला तडा गेला आहे. पोलिसांनी सक्रिय राहून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात. नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. शहराची अशीच प्रतिमा राहिली, तर उद्योजक इकडे फिरकणारही नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.