राज्यात कोरोना व्हायरसच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 52 हजार 844 इतकी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य रुग्णवाढीत देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यातच केंद्रानं राज्याला रात्रीच्या संचारबंदीची शिफारस केली आहे. त्यानंतर राज्यात काळजी घेण्याची गरज असल्याचं मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे.
तीन दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं राज्याला कोरोना संसर्गाचा दर अधिक असलेल्या भागांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सूचना केली. यावर राज्य सरकार विचार करत असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच केंद्र सरकारनं केलेल्या सूचनांची अंमलबजावणी राज्य सरकार नक्की करेल, असंही राजेश टोपेंनी म्हटलं आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील, असंही त्यांनी सांगितलं.
कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. राज्यातही सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळ राज्यात ओनम सणानंतर कोरोना रुग्णांचा आकडा वाढला. त्याचा प्रार्दुभाव पाहता केंद्रानं राज्याला रात्रीची संचारबंदीची सूचना केली. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही आपल्याला आपल्या अधिक काळजी घेण्याची गरज आहे. राज्यातही सणांचे दिवस येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याची अधिक आवश्यकता आहे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकार केंद्र सरकारनं केलेल्या सूचनेची अंमलबजावणी करेल. मात्र याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, अशी माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.(फोटो क्रेडीट – गुगल)