राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी या आघाडीतील तिन्ही पक्षांपैकी काँग्रेसने खूप आधीपासूनच स्वबळावर बोलायला सुरुवात केली. मात्र, आता काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसही स्वबळाची भाषा बोलतोय. कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वबळाचा नारा देणारं सूतोवाच केलंय. आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटला अस समजून कामाला लागा, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेत. ते कोल्हापुरात आयोजित कार्यकर्ता आढावा बैठकीत बोलत होते. शाहू सभागृहात ही बैठक पार पडली.
कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देताना आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांसह 10 विधानसभा स्वबळावर लढवण्याचे संकेत दिलेत. कार्यकर्ता आढावा बैठकीत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आगामी निवडणुकांच्या प्रचाराचा नारळ फुटला अस समजून कामाला लागा असे सूतोवाच केलेत. मुश्रीफ यांनीच पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना दिल्यानं आता कार्यकर्त्यांमध्येही उत्साह वाढलाय. या बैठकीत कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय देखील घेण्यात आला.
महाराष्ट्रात स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाचे पालन सगळ्यांना करावं लागतं, त्यामुळे सगळे नेते त्यासाठी तयार आहेत. राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना देण्यात आल्याचे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सांगितले. तसेच संघटनात्मक बाबींवर चर्चा झाल्याचेही पटोले म्हणाले.
आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही. कार्यकर्त्यांना स्वबळाचे आदेश दिले आहेत, निवडणुकीला अजून तीन वर्ष आहेत. आम्ही बोललो आहे, शब्द दिलाय माघार घेणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.