समीर वानखेडे यांची अखेर डीआरआय विभागात बदली

गेल्या काही दिवसांपासून उभ्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट ढवळून काढणारे एनसीबीचे वादग्रस्त ठरलेले विभागीय संचालक समीर वानखेडे यांची अखेर डीआरआय विभागात बदली करण्यात आली. वानखेडे यांचा एनसीबीमधील कार्यकाळ संपलाय. त्यामुळे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या डीआरआय अर्थात डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स विभागामध्ये पाठवण्यात आले आहे.

2008 ते 2021 पर्यंत वानखेडे यांनी एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) चे उपायुक्त, राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) अतिरिक्त एसपी, महसूल गुप्तचर संचालनालयाचे (डीआरआय) संयुक्त आयुक्त आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले. वानखेडेंची 2020 मध्ये एनसीबीमध्ये बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतरही त्यांना एनसीबीत ठेवण्यासाठी लॉबिंग सुरू आहे. भाजपचा एक मोठा नेता तसे प्रयत्न करत आहे, अशा आरोपाची राळ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी उठवली होती. मात्र, अखेर वानखेडे यांची बदली झाल्याचे वृत्त आज समोर आले आहे. वानखेडे यांनी जातीची बोगस कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली. आपला धर्म लपवला, असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले होते. मात्र, वानखेडेंनी हे सारे आरोप फेटाळलेत.

समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवरील पार्टीवर छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर 8 जणांना अटक केली होती. आर्यन खानच्या अटकेनंतर मोठा वाद निर्माण झाला होता. महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरण हा फर्जीवाडा आणि खंडणीचं प्रकरण असल्याचा आरोप समीर वानखेडेंवर केला होता. आर्यन खान प्रकरणातील साक्षीदारांवरुन देखील वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले.

2013 मध्ये समीर वानखेडेंनी गायक मिका सिंगला परदेशी चलनासह मुंबई विमानतळावर पकडले होते. अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मालमत्तांवर त्यांनी छापे टाकले आहेत. 2011 मध्ये सोन्याने मढवलेल्या क्रिकेट विश्वचषक ट्रॉफीला देखील कस्टम ड्यूटी भरल्यानंतरच मुंबई विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्या नावाचा एक दरारा होता. मात्र, आर्यनप्रकरणाने हे सारे चित्र बदलले. विशेषतः नवाब मलिकांनी त्यांच्याविरोधात एकामागून एक आरोप केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.