मराठीतील आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशीने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या चाहत्यांना एक गोड बातमी दिली असून, त्याच्या नवीन ‘अश्वत्थ’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अश्वत्थ’ 2022च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार असून, स्वप्नील जोशीने या चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर आज प्रकाशित करत असल्याची घोषणा केली.
‘अश्वत्थ’चा टीझर भगवत गीतेतील एका लोकप्रिय अशा श्लोकाच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. संकृतमधील या श्लोकाचा ढोबळ अर्थ असा – ‘जेव्हा मनुष्य योगारूढ होतो, तेव्हा तो आपला उद्धार स्वतःच करतो आणि स्वतःच आत्मबलाच्या सामर्थ्यावर ऊंची गाठतो. त्याने आपल्या आत्म्याचे अधःपतन होवू देता कामा नये. मनुष्य स्वतःच स्वतःचा बंधू असतो आणि स्वतःच स्वतःचा शत्रू असतो…’
चौखूर उधळलेल्या घोड्याच्या पृष्ठभूमीवर सादर होणाऱ्या या श्लोकानंतर टीझरमध्ये मराठी शब्द उधृत होतात. ते आहेत, “मन, बुद्धी, चित्त आणि अहंकारावर मात करून स्वाभिमानाने जगतो तो अश्वत्थ.” या टीझरच्या माध्यमातून चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक या चित्रपटाच्या एकूण कथेबद्दल एक कल्पना अधोरेखित करतात. त्यातून मग या चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी ताणली जाते.
या टीझरचा व्हीडीओ प्रसारित करून स्वप्नील जोशीने आपल्या चाहत्यांबरोबर ही गोड बातमी शेअर केली आहे. तो म्हणतो, “नवीन वर्ष, नवीन संकल्प! नांदी…नव्या वर्षाची, नव्या संकल्पाची!
चित्रपटाचे दिग्दर्शन प्रख्यात दिग्दर्शक लोकेश गुप्तेने केले आहे. एबी आणि सीडी, एक सांगायचंय,ऋुणानुबंध, डेटभेट आणि मुंगळा यांसारख्या दर्जेदार चित्रपटांनी आपले वेगळे स्थान लोकेशने याआधीच चित्रपटसृष्टीत निर्माण केले आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवा मैलाचा दगड उभा करण्यास तो सज्ज झाला आहे. टीझरमध्ये मकरंद देशपांडेचा आवाज ऐकू येतो. त्यामुळे यात मकरंदसुद्धा आहे का, याबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. चित्रपट 2022च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार आहे.
स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेल्या ‘अश्वत्थ’च्या पोस्टरची सोशल मिडीयासकट सगळीकडे जोरदार चर्चा असून, अनेक सुपरहीट चित्रपटांनंतर स्वप्निलला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. इतर कलाकार आणि तंत्रज्ञ याबद्दलची माहिती अजून गुलदस्त्यात असली तरीस्वप्नील जोशी आणि लोकेश गुप्ते हे नवं समीकरण, नव्या वर्षात, ‘अश्वत्थ’च्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर काहीतरी नवं आणणार, याबद्दल सर्वांनाच खात्री आहे.
विविध प्रयोग करत स्वतःच्या सशक्त अभिनयाने चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांच्या माध्यमातून आज स्वप्नील जोशी घराघरात पोहोचला आहे. रामायण, कृष्ण, हद कर दि, दिल विल प्यार, तू तू मैं मैं या गाजलेल्या मालिकांपासून दुनियादारी, मोगरा फुलला, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे अगणित गाजलेले चित्रपट स्वप्नीलच्या नावावर आहेत. अलीकडेच आलेल्या ‘समांतर’ या वेबसिरीजमध्ये स्वप्नीलची प्रमुख भूमिका होती आणि तिचे दोन्ही सिझन गाजले होते. या पार्श्वभूमीवर स्वप्नीलच्या या नवीन चित्रपटाबद्दल रसिकांच्या मनात उत्सुकता लागून राहिली आहे.