जोहान्सबर्ग मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व गाजवले. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी भारताला एक धक्का बसला. नियमित कर्णधार विराट कोहलीने पाठिच्या दुखण्यामुळे कसोटी खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्याच्याजागी बदली कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या सलामीच्या जोडीने आश्वासक सुरुवात केली.
पहिल्या कसोटीतील पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या कसोटीतही दोघे दमदार सलामी देतील असे वाटत होते. पण मयंक अग्रवालला (26) धावांवर जॅनसेनने कार्ल वेरेनकरवी झेलबाद केले. त्यानंतर चेतेश्वर पुजारा (3) आणि अजिंक्य रहाणे (0) आल्यापावली माघारी परतले. तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ओलिवरने दोघांची विकेट काढली.
हनुमा विहारीने कर्णधार राहुलसोबत मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण विहारी (20) धावांवर बाद झाला. केएल राहुलचे अर्धशतक (50) आणि अश्विनच्या (46) धावा या दोघांचा अपवाद वगळता भारताकडून कोणीही चांगली खेळी करु शकले नाही. मोठ्या भागीदाऱ्या झाल्या नाहीत, परिणामी भारताचा डाव 202 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज मार्को जेनसॅनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ओलिवर आणि रबाडाने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या डावाला सुरुवात झाल्यानंतर मोहम्मद शामीने मार्करामला पायचीत करुन आफ्रिकेला पहिला धक्का दिला. पण त्यानंतर एल्गर आणि पीटरसनने विकेट पडू दिली नाही. दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद 35 धावा झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिका पहिल्या डावात 167 धावांनी पिछाडीवर आहे. टीमचा कॅप्टन डीन एल्गर नाबाद (11) आणि किगन पीटरसन नाबाद (14) धावांवर खेळत आहे. उद्या ते डावाला पुढे सुरुवात करतील.